चंद्रपूर,
rajesh-adoor-surendra-adabale : महानगरपालिकेत आ. विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर गटातील संघर्षात अखेर खा. धानोरकर गटाने बाजी मारली. त्यांच्या गटाच्या 16 नगरसेवकांची बाजू ग्राह्य धरत, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी बुधवार, 17 जून रोजी काँगे्रसचे गटनेता राजेश अडूर यांची तात्काळ प्रभावाने हकालपट्टी केली. तर त्यांच्या जागी धानोरकर गटाचे सुरेंद्र अडबाले यांची गटनेता पदी नियुक्ती केली आहे.
आधी खा. धानोरकर यांच्याकडे 10, तर आ. वडेट्टीवार यांच्याकडे 17 नगरसेवक होते. त्यामुळे पक्षाने वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांना गटनेता बनवले होते. पण अडून यांना पदावरून हटवण्यासाठी आ. वडेट्टीवार गटाचे सहा नगरसेवक खा. धानोरकर गटाने आपल्याकडे वळवले. आता 27 पैकी 16 नगरसेवक खा. धानोरकर गटाकडे झाल्याने त्यांनी गटनेता बदलण्याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यावर बुधवारी निकाल आला असून, ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 27 सदस्यांपैकी 16 म्हणजे बहुसंख्य सदस्यांनी सुरेंद्र अडबाले यांना पक्षाचा गटनेता निवडला असल्यामुळे आणि त्यांचा अडबाले यांना पूर्ण पाठींबा असल्याने राजेश अडूर यांची गटनेता म्हणून केलेली नोंदणी तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे. तसेच यापुढे सुरेंद्र अडबाले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चंद्रपूर शहर महानगरपालिका गटाचा नेता असेल. त्यांच्या निवडीची नोंद 17 जून रोजी अभिलेखात घेण्यात येत आहे’, असा आदेश बिदरी यांनी पारित केला.
आ. वडेट्टीवार गटाचे विद्यमान गटनेता राजेश अडूर यांना बाद करण्याच्या हालचाली गेल्या महिन्याभरापासून खा. धानोकर गटाने चालवल्या होत्या. हे लक्षात येताच अडूर यांनी रविवारी नगरसेवकांची बैठक बोलावली. त्या बैठकीला काँगे्रसचे 27 पैकी केवळ 11 नगरसेवक हजर होते. 16 नगसेवकांनी अडरू यांचा व्हिप झुगारला. तर त्याच 16 नगरसेवकांनी मंगळवारी खा. धानोरकर गटाच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. यावरून अडूर यांच्याविरुध्दच्या अविश्वासाचा संकेत स्पष्ट झाला होता.
गैरहजर राहिलेल्या 16 नगरसेवकांवर पक्षशिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी राजेश अडूर यांनीही विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली होती. पण त्यांचा अर्ज फेटाळ्ण्यात आला.