रंगयात्रेचा डिजिटल पडदा उघडला

नाट्यगृह बुकिंगला ऑनलाइन तालमीचा नवा रंग

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
पुणे
Pune Municipal Corporation शहरातील नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्रे आणि कलादालनांच्या आरक्षण प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘रंगयात्रा’ मोबाइल अ‍ॅपमुळे बुकिंग व्यवस्थेत डिजिटल क्रांती घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नव्या प्रणालीमुळे पारंपरिक ऑफलाइन पद्धतीला पर्याय उपलब्ध होत असून, नाट्यनिर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांसाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुलभ होणार आहे.
 

Pune Municipal Corporation  
महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या या अ‍ॅपद्वारे बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णाभाऊ साठे प्रेक्षागृह आणि गणेश कला क्रीडा मंच यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या उपलब्ध तारखांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी आरक्षणासाठी संबंधित कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज करावा लागत असे. मात्र आता ही संपूर्ण प्रक्रिया मोबाइल आणि संगणकाच्या माध्यमातून पार पाडता येणार असल्याने वेळ आणि श्रम यांची मोठी बचत होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या अ‍ॅपमध्ये ऑनलाइन अर्ज सादर करणे, मान्यता मिळवणे, शुल्क भरणे, पावती मिळवणे तसेच रद्दीकरण आणि परताव्याची प्रक्रिया या सर्व सुविधा Pune Municipal Corporation  उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय आरक्षणासंदर्भातील माहिती, उपलब्ध तारखा आणि कार्यक्रमांचे नियोजन याबाबतही पारदर्शकता वाढेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.दरम्यान, या नव्या प्रणालीवर काही नाट्यकर्मी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संघटनांनी मात्र प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑनलाइन पद्धतीमुळे मोठ्या संस्थांकडून तारखांवर वर्चस्व निर्माण होऊन छोट्या नाट्यसंस्थांवर अन्याय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आरक्षण प्रक्रियेतील बदलामुळे पारंपरिक ‘तारीख वाटप’ पद्धतीवर परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन प्रणाली केवळ प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी आहे. अंतिम तारखांचे वाटप पूर्वीप्रमाणेच तपासणी आणि नियमानुसार केले जाणार असून, नाटकांना प्राधान्य देण्याची जुनी पद्धत कायम ठेवली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
शहरातील सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे एकीकडे पारदर्शकता आणि डिजिटल सुलभता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना, दुसरीकडे कलाकार आणि आयोजकांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि चिंता कायम आहे. पुढील काळात या प्रणालीची अंमलबजावणी कशी होते, यावरच तिचे यश अवलंबून असेल, असे मत सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.