साकोली
Sakoli lake महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी साकोली येथे लोकसहभागाच्या माध्यमातून तलाव खोलीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून या उपक्रमाला टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे व मृद व जलसंधारण विभागाचे चाचेरे साहेब आणि सुशांत गडकरी साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. तसेच साकोलीच्या नगराध्यक्ष देवश्री मनीष कापगते यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामाला गती दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे तलाव खोलीकरणाचे काम वेगाने सुरू असून परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी होत आहेत.
तलावामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहोचविण्यात येत आहे. या गाळामध्ये सेंद्रिय घटक व पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्यास मदत होणार असून भविष्यात उत्पादनवाढीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तलाव खोलीकरणामुळे Sakoli lake जलसाठा क्षमता वाढणार असून पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाणी साठवता येणार आहे. परिणामी भूजल पातळी वाढण्यास मदत होईल तसेच परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोतांनाही फायदा होणार आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून शासन, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून जलसंधारण व शेती विकासाचे आदर्श उदाहरण साकार होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. साकोली येथील हा लोकसहभागाचा उपक्रम भविष्यात इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.