खा. संजय देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्त

राजकीय चर्चांना उधाण

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sanjay-deshmukhs : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे उबाठा शिवसेना खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस येथील घराबाहेर अचानक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
 
 
y17Jun-Deshmukh
 
 
 
खासदार संजय देशमुख हे उबाठा शिवसेना सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपासून वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांची उपस्थिती वाढल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
 
 
स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांची निवासस्थानाकडे वाढती वर्दळ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत पोलिस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
 
 
दरम्यान, खासदार संजय देशमुख यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असली तरी त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सध्या ते दिल्ली येथे असल्याचे समजते.
 
 
विशेष म्हणजे, या घडामोडींमुळे उबाठा शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस बंदोबस्तामुळे देशमुख यांच्या निवासस्थान परिसरात दिवसभर राजकीय चर्चांना उधाण आले होते.