गोंदिया,
shalu kawale शासनाकडून माजी सैनिकांना देण्यात येणार्या सिलींगची जमीन मिळावी यासाठी अर्ज केलेल्या माजी सैनिकाला संबंधित अर्जावर कार्यवाही करण्याच्या नावावर 50 हजार रुपयांची लाच मागणार्या येथील लहसील कार्यालयातील लाचखोर महिला महसूल सहाय्यकाला 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवार 17 जून रोजी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. शालू कमलेश कावळे, महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय गोंदिया असे त्या लाचखोर महिला महसूल सहाय्यकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे भारतीय नौसेने चे माजी सैनिक व पोलिस खात्यातून सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक असून ते माजी सैनिक असल्याने शासनाकडून तालुक्यातील तेढवा येथील सिलिंगची जमीन भूमापन क्रमांक 174 मिळावी यासाठी त्यांनी तहसीलदार गोंदिया यांच्याकडे जमीन नावावर करून देण्याबाबत अर्ज सादर केले होते. यावर संबंधित महिला महसूल सहाय्यक शालू कावळे यांनी सदरील अर्जावर कार्यवाही करण्याकरिता 50 हजार लाचेची मागणी केली. तर 10 हजार रुपये अॅडव्हांस व उर्वरीत रक्कम काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी मंगळवार 16 जून रोजी गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने पडताळणी कारवाई करून बुधवारी सापळा कारवाई केली असता आरोपी शालू कावळे यांना तक्रारदार यांचेकडून 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.shalu kawale दरम्यान, आरोपीच्या अंगझडतीतून मिळालेले 10 हजार रुपये, व जुना वापरता मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक निलेश सुरेश लोधी यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सापळा कारवाई पोलिस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.