मुंबई
Uddhav Thackeray शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन १९ जून रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये साजरा होणार असतानाच पक्षातील काही खासदारांच्या संभाव्य भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित खासदार दिल्लीमध्ये दाखल झाले असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत अथवा शिंदे गटात विलिनीकरणासंदर्भात पत्र सादर केले जाऊ शकते. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी समाजमाध्यमांवर एक भावनिक आणि सूचक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर अप्रत्यक्ष भाष्य करण्यात आले आहे. “शिवसेनेला मोठा धक्का”, “जोरदार धक्का”, “तगडा धक्का” अशा मथळ्यांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी पक्षाच्या ताकदीची तुलना जनतेच्या विश्वासावर उभ्या असलेल्या भक्कम वृक्षाशी केली आहे. “वाऱ्यासोबत उडणारी पाने खूप असतात, पण इतिहास मात्र मुळांशी एकनिष्ठ राहिलेल्या वृक्षांचाच घडतो,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या विधानातून पक्ष सोडण्याची चर्चा असलेल्या खासदारांवर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केल्याचे मानले जात आहे.
काय निर्णय घेणार
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर काहींनी ऑनलाइन सहभाग नोंदविला होता. बैठकीला राज्यसभा सदस्य संजय राऊतही उपस्थित होते. त्यावेळी पक्षात संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, ठाकरे गटाकडून अशा शक्यता फेटाळण्यात आल्या होत्या.
त्यानंतरच्या घडामोडींमध्ये संजय राऊत यांनी काही खासदारांना पक्षांतरासाठी आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला. तर खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवून पक्षाशी संबंधित कोणत्याही संभाव्य निर्णयांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.दरम्यान, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे. ते दिल्लीला रवाना झाले असले तरी त्यांनी आपली राजकीय भूमिका बदललेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही ते ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबतच कायम राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, त्यातून राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.