मुंबई,
Om Birla लोकसभेत शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाला निर्णायक वळण मिळाले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे पक्षातील गटबाजी अधिकृत स्वरूपात मान्य झाल्याचे मानले जात असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचा अर्ज कालच लोकसभा अध्यक्षांकडे सादर केला होता. या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी तातडीने कार्यवाही करत हा गट मान्य केल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे शिवसेनेच्या संसदीय अस्तित्वावर आणि व्हीपच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, या निर्णयापूर्वी उद्धव ठाकरे गटाकडून तीव्र विरोध नोंदवण्यात आला होता. खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना चार पानी पत्र पाठवून कोणताही स्वतंत्र गट मान्य करण्यापूर्वी मूळ पक्षाची भूमिका ऐकून घेण्याची विनंती केली होती. तर खासदार संजय राऊत यांनीही तत्काळ अध्यक्षांची भेट घेऊन निर्णयाला आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला.
या घडामोडींच्या Om Birla पार्श्वभूमीवर शिंदे गटातील विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सहा खासदारांनी आधीच स्वतंत्र गटासाठी अर्ज सादर केल्याने आणि त्यानंतर व्हीप जारी झाल्याने, त्या व्हीपची अंमलबजावणी कितपत लागू राहते यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील हे सहा खासदार — संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील — आता पुढील भूमिका कधी स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे सर्व खासदार लवकरच मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात नवीन गटाच्या भूमिकेसह उपस्थित राहतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये या घडामोडींचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.