सहा खासदारांचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’

दुसऱ्यांदा शिवसेना फुटली, ऑपरेशन टायगर मोहीम फत्ते

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
split in shiv sena गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली ‘ऑपरेशन टायगर मोहीम’ अखेर फत्ते झाली असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकरेसेनेतील फुटीर गटाला मान्यता दिली असून त्यामुळे शिंदे शिवसेनेत त्यांच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मंगळवारी रात्रीच पत्र दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ओम बिर्ला यांच्या मान्यतेनंतर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब झाले.
  
shivsena
split in shiv sena ऑपरेशन टायगरच्या पृष्ठभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दिल्ली निवासस्थानी मंगळवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह ठाकरे सेनेचे सहा खासदार आणि 16 जणांची कायदेविषयक सल्लागार टीम उपस्थित होती. खासदार फुटल्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ नये आणि कायदेशीर अडचणी येऊ नयेत, यासाठी एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी कायदेविषयक सल्लागार टीमची मते जाणून घेतली. त्यानंतरच त्यांनी अंतिम रणनीती आखून ती यशस्वी राबवली.

split in shiv sena व्हीप काढण्याआधीच लोकसभा अध्यक्षांना पत्र
शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांचा अधिकृतरित्या आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या मंचावर जाऊन शक्तिप्रदर्शन करतील. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची प्रक्रिया अतिशय शांतपूर्वक राबविण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप काढण्याआधीच सहा फुटीर खासदारांचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानुसार ओम बिर्ला यांनी बुधवारी सकाळी फुटीर गटाला मान्यता दिली. त्यामुळे शिंदे शिवसेनेत त्यांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.