ठाणे
Smart Meter Protest स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. कल्याण आणि ठाण्यानंतर आता डोंबिवलीतील रहिवाशांनीही महावितरणविरोधात अनोखे आंदोलन सुरू केले असून काही गृहनिर्माण संस्थांनी थेट वीजमीटर केबिनला कुलूप ठोकत आपला निषेध नोंदवला आहे. नागरिकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत रहिवाशांनी महावितरणला लेखी निवेदन सादर केले असून, कोणतीही सक्ती केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नवसंकुलसह काही सोसायट्यांमध्ये महावितरणच्या मीटर केबिनला कुलूप लावण्यात आले आहे. रहिवाशांच्या मते, काही भागांमध्ये कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या परिसरातही अशी कारवाई होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांनी महावितरणला Smart Meter Protest दिलेल्या निवेदनात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अधिकृत नोटीस देण्याची मागणी केली आहे. तसेच सोसायटी स्तरावर चर्चा आणि संमतीनंतरच पुढील निर्णय घेतला जावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढण्याची शक्यता, तांत्रिक अडचणी आणि मीटर रीडिंगमधील संभाव्य त्रुटींबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, कुलूप लावलेल्या मीटर केबिनची छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या मुद्द्यावर डोंबिवलीतही तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्मार्ट मीटरविरोधात आक्रमक आंदोलन छेडले आहे. मागील काही दिवसांपासून नागरिकांना ४८ तासांच्या आत स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याचे संदेश पाठविले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी गळ्यात स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलांची छायाचित्रे परिधान करून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निषेध म्हणून स्मार्ट मीटर आणि दूरचित्रवाणी संच फोडण्यात आले. आंदोलनादरम्यान महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.मनसे पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात न घेता मीटर बदलण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या भूमिकेमुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा आता राजकीय पातळीवरही अधिक चर्चेत आला आहे.
नागरिकांचा रोष
बदलापूरमध्येही स्मार्ट मीटरविरोधात नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी स्मार्ट मीटर बसविण्याच्या कथित सक्तीविरोधात उपोषण सुरू केले आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर वाढीव वीजबिलांचा भार पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून, नागरिकांचा विरोध असतानाही मीटर बसविण्याची मोहीम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मात्र, महावितरणने नागरिकांकडून करण्यात येणारे आरोप फेटाळून लावले आहेत. शासनाच्या धोरणानुसारच स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात कोणतीही अनावश्यक वाढ होत नसून वीज वापराची अधिक अचूक नोंद ठेवणे शक्य होत असल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेच्या कायदेशीरतेबाबतही विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केंद्र शासनाच्या अधिसूचना, विद्युत कायदा २००३ आणि नियामक आयोगाच्या नियमांचा हवाला देत ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. ग्राहकांना पुरेशी पूर्वसूचना देणे, तांत्रिक बिघाड झाल्यास जबाबदारी निश्चित करणे आणि वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचे निराकरण करणे या मुद्द्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्यात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस वाढत असून नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेत आहेत. दुसरीकडे, महावितरण आपल्या धोरणावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रश्नावर तोडगा कसा निघतो आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.