मुंबई,
The Maharashtra Files Movie सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा मराठी चित्रपट द महाराष्ट्र फाईल्स सध्या प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. सरकारी व्यवस्थेकडून मिळालेल्या अपुऱ्या नुकसानभरपाईविरोधात एका सामान्य महिलेने उभारलेल्या संघर्षाची ही कथा असून, व्यवस्थेतील अडथळे, न्यायासाठीची धडपड आणि वंचित घटकांच्या समस्यांचे वास्तववादी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
हा चित्रपट २०१३ मधील धर्मा पाटील यांच्या सत्य घटनेवर प्रेरित असल्याचे सांगितले जाते. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या सामान्य नागरिकांच्या वेदना आणि संघर्षाला केंद्रस्थानी ठेवत, हा चित्रपट एका व्यक्तीची कथा न राहता व्यापक सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब मांडतो. शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी सामान्य माणसाला करावा लागणारा संघर्ष प्रभावीपणे दाखवण्यात आल्याचे चित्रपटातून दिसून येते.कथानक जनाबाई राठोड या बंजारा समाजातील अशिक्षित महिलेभोवती फिरते. सरकारी प्रकल्पासाठी तिची जमीन ताब्यात घेतली जाते, मात्र त्याबदल्यात मिळणारी नुकसानभरपाई अत्यंत कमी असल्याने ती व्यवस्थेविरोधात न्यायासाठी लढा उभारते. या प्रवासात तिच्यासोबत रणवीर देशमुख आणि नयना पाटील हे पात्र तिच्या लढ्याला साथ देतात, ज्यामुळे कथेला वेगळे परिमाण मिळते.चित्रपटाची कथा आणि पटकथा संजीवकुमार राठोड यांनी लिहिली असून, ती प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा The Maharashtra Files Movie प्रयत्न करते. सामान्य माणूस व्यवस्थेविरोधात उभा ठाकण्याची संकल्पना प्रभावी असली तरी कथानक काही ठिकाणी परिचित वाटते, अशी प्रतिक्रिया चित्रपट समीक्षकांकडून व्यक्त होत आहे. तरीही काही प्रसंग भावनिकदृष्ट्या परिणामकारक ठरतात आणि सामाजिक वास्तव अधोरेखित करण्यात यशस्वी होतात.
द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांत १० कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. सामाजिक विषय, दमदार अभिनय आणि वास्तवदर्शी मांडणीमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद सकारात्मक असल्याचे दिसून येते.
या चित्रपटात उषा नाडकर्णी, मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे, तसेच सनी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. मोठ्या कलाकारांच्या फौजेसह सादर झालेला हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो.