महाराष्ट्रात पावसाची दांडी अन् उकाड्याची एंट्री!

    दिनांक :17-Jun-2026
Total Views |
मुंबई,
There is no rain in Maharashtra पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात मान्सूनची प्रगती गेल्या काही दिवसांपासून मंदावली असून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा जून महिन्यात देशाच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या अल निनोच्या प्रभावामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती कमी झाली असून त्याचा परिणाम मान्सूनच्या पुढील वाटचालीवर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
 

 rain in Maharashtra 
 
 
 
विदर्भात तापमानवाढीचा इशारा
सध्या मान्सूनची रेषा कोकण किनारपट्टीपासून सोलापूर परिसरापर्यंतच स्थिरावलेली आहे. गेल्या आठवड्याभरात मान्सूनने विशेष प्रगती केलेली नसल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उकाडा आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाच्या मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या १८ आणि १९ जूनदरम्यानही राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.
 
 
 
२५ जूननंतर परिस्थितीत बदलाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, समुद्रातून पुरेशा प्रमाणात आर्द्रता उपलब्ध असूनही वरच्या वातावरणातील वाऱ्यांच्या बदललेल्या रचनेमुळे मान्सूनला अपेक्षित गती मिळत नाही. पश्चिमेकडील जेट प्रवाहाच्या स्थितीत झालेल्या बदलांचा परिणाम मोसमी वाऱ्यांवर होत असून त्यामुळे पावसाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, २५ जूननंतर परिस्थितीत बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई, कोकण आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात मान्सूनला पुन्हा वेग मिळू शकतो. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता महिन्याच्या अखेरच्या आठवड्याकडे लागले आहे.