कूचबिहार,
TMC leader Udayan Guha arrested पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते आणि माजी मंत्री मंत्री उदयन यांना पोलिसांनी अटक केली आहे. कूचबिहार पोलिसांनी ही कारवाई कोलकात्यातील फूलबागान परिसरात केली असून या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी कूचबिहार जिल्हा पोलिसांचे विशेष पथक फूलबागान येथील एका फ्लॅटवर पोहोचले आणि तेथे चौकशीनंतर उदयन गुहा यांना ताब्यात घेण्यात आले. ते गेल्या काही काळापासून याच परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी त्यांच्या अटकेबाबत अधिकृतपणे नेमके कारण जाहीर केलेले नसले तरी, त्यांच्यावर काही जुन्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिनहाटा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांच्या नावावर प्रक्षोभक वक्तव्ये, हिंसाचार भडकावणे आणि निवडणुकीशी संबंधित घटनांमध्ये सहभाग असल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांचे लक्ष होते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही अटक झाल्याचे बोलले जात आहे.या कारवाईमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून विरोधक आणि सत्ताधारी गटांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. उदयन गुहा हे उत्तर बंगालमधील प्रभावशाली राजकीय चेहरा मानले जात असून फॉरवर्ड ब्लॉकमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते.