नागपूर,
pipe leakage in Jaytala जयताळा रोड बाजार चौक परिसरात मागील पाच दिवसांपासून पाण्याचा मुख्य नळ फुटलेला असून मोठ्या प्रमाणात पाणी सतत वाया जात आहे. दुपारी सुमारे तीन वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या भागातून पाणी अखंडपणे वाहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अद्यापपर्यंत या गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही.
एकीकडे “पाणी वाचवा, पाण्याचा थेंबही वाया जाऊ देऊ नका” असे आवाहन सातत्याने केले जाते, तर दुसरीकडे गेल्या पाच दिवसांपासून लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, पाणी वापर जास्त झाल्यास नागरिकांना वाढीव बिल आकारले जाते, मात्र अशा मोठ्या प्रमाणातील गळतीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या पाण्याच्या अपव्ययाला जबाबदार कोण, असा सवाल आता परिसरात तीव्र होत असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सौजन्य: शर्मिला चौरसिया, संपर्क मित्र