तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
rupesh-tembhurne : सक्तीने स्मार्ट मिटर लावणार असल्याचे मेसेज महावितरणकडून वीज ग्राहकांना 13 जूनला व्हॉटसअपवर आले होते. या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत व यवतमाळ जिल्हा शाखेने बुधवार, 17 जूनला सकाळी 11 वाजता अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांना निवेदन दिले.
त्यावर त्यांनी सांगितले की, सक्तीने स्मार्ट मिटर लावण्याची कोणतीही योजना नाही. ज्यांचे मिटर खराब झाले आहेत त्या जागी स्मार्ट मिटर लावण्यात येतील. कारण जुने मिटर आता शिल्लक नाहीत. ग्राहक पंचायतच्या निवेदनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते की, स्मार्ट मिटर सामान्य ग्राहकांना लागणार नाही. विद्युत नियमानुसार ते लावण्यासाठी ग्राहकांची लेखी मंजुरी आवश्यक आहे.
त्यावर अधीक्षक अभियंता टेंभुर्णे म्हणाले, ग्राहकांची लेखी मंजुरी असल्याशिवाय वीज कर्मचारी स्मार्ट मिटर कुणाही ग्राहकांच्या घरी लावणार नाही. स्मार्ट मिटर चांगले आहे, लोकांनी त्याच्या वाईट अफवा पसरवल्या आहेत. आजकाल स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन यांचा प्रयोग यासाठी जास्त होत आहे की ते पहिल्या फोन, घड्याळ, टीव्हीपेक्षा अपडेट आणि चांगले आहेत. त्याचप्रकारे स्मार्ट मिटरसुद्धा चांगले आहे. पण महावितरण याचे फायदे सांगण्यात कमी पडली आहे. त्यामुळे या अफवा पसरत आहे.
घरात जर विजेचा लिकेज असेल तर शॉक लागून मृत्युपण होऊ शकतो. स्मार्ट मिटरमध्ये ही घटना टाळल्या जाऊ शकते, असे फायदेसुद्धा अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनंत भिसे, विदर्भ प्रांत कार्यालय प्रमुख हितेश सेठ, प्रांत प्रचार प्रमुख बिरेंद्र चौबे, जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत गड्डमवार, जिनेंद्र बंगाले आणि संजय जोशी यांना सांगितले.
तसेच यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे अर्ज करण्याची गरज नाही. त्यांच्या संमतीशिवाय हे स्मार्ट मिटर लावण्यात येणार नसल्याचे आश्वासनसुद्धा त्यांनी दिले.