तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : मृग नक्षत्र कोरडे जाऊन पावसाने ताण दिल्यावर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाला विनंती किंवा आर्जव करण्यासाठी धोंडी काढल्या जातात. धोंडी काढल्याने वरुणराजा प्रसन्न होऊन पाऊस पाडेल अशी बळीराजाची परंपरागत श्रद्धा आहे. मात्र ग्रामीण भागात निघणाèया या धोंडीचे शहरातील आगमन म्हणजे पावसाठी आर्जवापेक्षा पैसे उकळण्याची संधीच जास्त वाटते.
काळ्या ढगाला ग्रामीण भागात धोंडी म्हणतात. ऐन खरीपाच्या तोंडावर रुसलेल्या धोंडीने प्रसन्न होऊन आपल्या शिवारात मनसोक्त बरसावे म्हणून ग्रामीण भागात दोन व्यक्तींच्या कमरेला कडुनिंबाच्या फांद्या गुडाळून त्यांच्या हातात मुसळ दिल्या जाते. या मुसळाला बेडूक अथवा एखाद्या पिवळ्या कापडात सुपारी ठेवून बांधली जाते. त्यानंतर तयार झालेली ही ‘धोंडी’ वाजत गाजत गावातील प्रत्येक घरासमोर नेली जाते.
घरासमोर आलेल्या या धोंडीवर पाणी टाकून त्याची पूजा केली जाते. तसेच धान्य अथवा काही पैसे दिले जातात. या जमा झालेल्या साहित्यातून गावातील मंदिरात महाप्रसाद ठेवला जातो. तर काही ‘अट्टल’ यातही पैसे उकळण्याची संधी शोधतात. ते धोंडी काढून त्यातून जमा होणारी रक्कम ‘देशी’सह इतर चंगळ करण्यासाठी वापरतात.
यातील पैसे मिळण्याची संधी पाहून ‘जिथे फुकट तिथे प्रगट’ संघटनेचे बेरोजगार आता शहरी भागातील दुकानादुकानांतून धोंडी फिरवताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात अनेक धोंडी फिरताना दिसून येत आहेत.
ही धोंडी फिरवताना ते मुसळीला करकचून बांधलेल्या मुक्या बेडकाचाही जीव घ्यायला मागेपुढे बघत नाही. अनेक धोंडीवर बांधलेले बेडूक मृत्यूमुखी पडतात. यातून जमा केलेल्या रकमेचा विनियोग ते कशासाठी करतात हे सांगण्याची गरज नाही.