चंबामध्ये दरीत कार कोसळून ७ जणांचा मृत्यू

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
चंबा,
7 killed in accident in Chamba हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. मसरुंद-हमल रस्त्यावर पहाटे सुमारे २ वाजता एका बोलेरो वाहनावरील नियंत्रण सुटून ते खोल दरीत कोसळले आणि या अपघातात एकाच गावातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.हे सर्वजण काकाडोथा गावात आयोजित मुंडन समारंभाला उपस्थित राहून आपल्या गावाकडे परतत होते. प्रवासादरम्यान अचानक वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आणि आत अडकलेल्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
 
chamba
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अंधार, तीव्र उतार आणि दुर्गम भागामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. गावकऱ्यांनी धाडस दाखवत दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले. या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कडेला सुरक्षारक्षक बॅरियर्स नसल्याबद्दल गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. योग्य सुरक्षा उपाययोजना असत्या तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोपही करण्यात येत आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला असून प्रशासन मृतांची ओळख पटविण्याचे काम करत आहे. दरम्यान, हिमालयीन डोंगराळ भागात वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे रस्ते सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खराब रस्ते, तीव्र वळणे आणि संरक्षण भिंतींचा अभाव यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.