अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांत २०% आरक्षण जाहीर

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Agniveers in government jobs दिल्ली सरकारने माजी अग्निवीरांसाठी मोठा निर्णय घेतला असून गट ‘क’ श्रेणीतील सरकारी नोकऱ्यांमध्ये २० टक्के आरक्षण लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.या निर्णयानुसार दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबल, अग्निशमन दल, तुरुंग रक्षक, वनरक्षक आणि वन्यजीव रक्षक अशा विविध गट ‘क’ पदांवरील भरतीमध्ये माजी अग्निवीरांना विशेष आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या तरुणांनी सैन्यात केलेल्या सेवेतील शिस्त, प्रशिक्षण आणि कौशल्यांचा नागरी सेवेत प्रभावी वापर व्हावा, हा या धोरणामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
 

दिल्ली अग्नीवर आरक्षण घोषित 
एलजी कार्यालयाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित सर्व विभागांना भरती प्रक्रियेतील आवश्यक बदल ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक विभागाला माजी अग्निवीरांच्या कौशल्यानुसार त्यांना योग्य पदांवर नियुक्त करण्याची मुभाही देण्यात आली आहे. या निर्णयामुळे माजी अग्निवीरांना देशभरातील पात्र उमेदवार म्हणून दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला आहे. या धोरणामुळे प्रशासन अधिक सक्षम होईल आणि सार्वजनिक सेवा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.