धुमधडाका’ फेम अभिनेत्री ऐश्वर्या राणे आर्थिक संकटात

उदरनिर्वाहासाठी महापालिकेकडे मदतीची धाव

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
मुंबई
Aishwarya Rane मराठी चित्रपटसृष्टीतील एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राणे सध्या गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जात असल्याची माहिती समोर आली आहे. ‘धुमधडाका’ या सुपरहिट चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता उदरनिर्वाहासाठी मुंबई महापालिकेकडे मदतीची मागणी केल्याचे समजते.
 

Aishwarya Rane, Ashok Saraf Dhumdhadaka actress, 
‘धुमधडाका’ चित्रपटात त्यांनी साकारलेली सीमा वाकडे ही भूमिका विशेष गाजली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांचे करिअर वेगाने पुढे सरकले. त्या काळात त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत असल्याने त्या यशाच्या शिखरावर पोहोचत असल्याचे मानले जात होते. या यशाच्या काळात त्यांची ओळख मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून निर्माण झाली होती.
याशिवाय ऐश्वर्या राणे यांनी ‘भटकभवानी’ आणि ‘माणुसकी’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी ‘नमक हलाल’ आणि ‘शराबी’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले असून, अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांसारख्या कलाकारांसोबतही त्या झळकल्या होत्या.मिळालेल्या माहितीनुसार, एका अपघातानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. शूटिंगसाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली, ज्यात डोक्याला आणि चेहऱ्याला इजा झाली. या अपघातामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आणि त्यांना चित्रपटसृष्टीपासून दूर व्हावे लागले. त्यानंतर हळूहळू कामाच्या संधी कमी होत गेल्या आणि आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.
सध्याच्या परिस्थितीत Aishwarya Rane उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबई महापालिकेकडे स्टॉल उभारण्याची परवानगी मागितल्याचे समजते. मंत्रालय परिसरात विक्रीसाठी स्टॉल मिळावा, अशी त्यांची विनंती असून, यासंदर्भात महापौरांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, स्टॉल वाटपासाठी स्पष्ट धोरण नसल्याने हा प्रस्ताव प्रशासकीय प्रक्रियेत अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकेकाळी रुपेरी पडद्यावर चमकणाऱ्या या अभिनेत्रीची सध्याची स्थिती ही चित्रपटसृष्टीतील अस्थिरतेचा आणि कलाकारांच्या आयुष्यातील अनिश्चिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ठरत आहे.