कोराडी येथे आजपासून भव्य नागपूर भक्ती महोत्सव

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
- अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण
- संतवाणी, कीर्तन आणि प्रवचनांनी परिसर भक्तिमय होणार

नागपूर :
akhand harinam Saptah वारकरी संप्रदायाची परंपरा, संतविचारांचा जागर आणि अखंड हरिनामाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण करणारा ‘नागपूर भक्ती महोत्सव’ यंदा १८ ते २३ जून २०२६ या कालावधीत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी आणि नागपूर भक्ती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असून, ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि हरिजागर यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
thakare
 
महोत्सवाची सुरुवात गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ६ वाजता आई महालक्ष्मी जगदंबा व ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पूजनाने होणार आहे. श्री संजयजी महल्ले, श्री भास्करजी तिडके आणि श्री किरणजी राऊत यांच्या शुभहस्ते पूजन विधी संपन्न होईल. त्यानंतर सामुदायिक श्रीज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ होणार आहे. महोत्सवादरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ या वेळेत काकड आरती, सकाळी ६.३० ते ९.३० श्रीज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ कीर्तन सेवा, सायंकाळी ४ ते ५ हरिपाठ, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन सेवा आणि रात्री ९ नंतर हरिजागर असा नियमित कार्यक्रम राहणार आहे.
आजची कीर्तन सेवा
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळचे सत्र सकाळी १० ते १२ या वेळेत होणार असून, त्यामध्ये ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांचे कीर्तन होईल. तसेच सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत होणाऱ्या सत्रात देहू येथील ह.भ.प. गुरुवर्य बाळासाहेब महाराज देहूकर यांची कीर्तन सेवा संपन्न होईल. भक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम असलेल्या या महोत्सवात नागपूरसह संपूर्ण विदर्भातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.