गडचिरोलीतील चार उपसा सिंचन प्रकल्पांना मंजुरी

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
गडचिरोली, 
irrigation projects in gadchiroli गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या दीर्घकालीन सिंचनाच्या प्रश्‍नाला दिलासा देणार्‍या चार महत्त्वपूर्ण उपसा सिंचन योजनांना राज्य शासनाने मंजुरी दिल्याची माहिती माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी आज, 18 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या योजनांसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे त्यांनी सांगितले.
 

irrigation gadchiroli 
 
 
डॉ. नेते यांनी सांगितले की, रंगयापल्ली (ता. सिरोंचा), रमेशगुडम (ता. सिरोंचा), शांतीग्राम (ता. मुलचेरा) आणि राजीव-चिचडोह (ता. चामोर्शी) या चार उपसा सिंचन योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमधील हजारो हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार आहे.
 
या चार योजनांसाठी शासनाने सुमारे 1 हजार 522 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला असून जवळपास 10 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः सिरोंचा, चामोर्शी आणि मुलचेरा तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील शेतकर्‍यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
 
गडचिरोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने सकारात्मक भूमिका घेतली असून या निर्णयातून जिल्ह्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाल्याचे डॉ. नेते यांनी नमूद केले.irrigation projects in gadchiroli
या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, प्रणय खुणे, रमेश भुरसे, अरुण हरडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.