उमरखेड,
assailants of shiv sainik apprehended शहरातील शिवसेना कार्यकर्ते रमेश चव्हाण यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा अवघ्या 48 तासांत छडा लावत उमरखेड पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, 16 जून रोजी संध्याकाळी 7.40 वाजता रमेश चव्हाण दुचाकीने घरी जात असताना नगर परिषद मुख्याधिकाèयांच्या शासकीय बंगल्याजवळ तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन इसमांनी स्कूटीवर येत त्यांना अडवले. त्यांनी लोखंडी गजाने त्यांच्या पायावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच चाकूने गळ्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात विशेष पथके तयार करण्यात आली. ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक व गोपनीय तपास सुरू केला.
आरोपींनी तोंडाला रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींचा माग काढला. आरोपी तेलंगणात पळून जाण्याच्या तयारीत असताना मध्यरात्री सापळा रचून अवधूतवाडी पोलिस ठाणे हद्दीतून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात सय्यद आरिफ उर्फ धार सय्यद युसूफ (वय 27, सचिननगर, उमरखेड) आणि अहेफाजोद्दीन उर्फ गौसोद्दीन मुज्जुमोद्दीन काझी (वय 26, सुकळी, ता. उमरखेड) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी परवेझ उर्फ लाला सलीम खान याच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याची कबुली दिली. तसेच लाला याने आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई सहनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, उपनिरीक्षक गणेश मुंढे, डीबी प्रमुख शरद लोहकरे तसेच उमरखेड पोलिसांनी यशस्वी पार पाडली.