घाटंजीतील अनेक पानटपऱ्यांना टाळे
धडक मोहिमेमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ
घाटंजी,
ban on scented tobacco कडक शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिकेमुळे राज्यभर ओळखले जाणारे दबंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच राज्यभर धडक तपासणी मोहिमेला वेग आला आहे. त्यांच्या नेतृत्वातील या कारवाईचे पडसाद आता यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातही उमटू लागले आहेत. एफडीएच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने घाटंजी शहरातील बहुतांश पानटपऱ्या बंद असून, अनेक ठिकाणी गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री थांबविण्यात आल्याचे चित्र आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा कायम असते. अनेक पानटपरी चालकांचा प्रमुख व्यवसायच या वस्तूंच्या विक्रीवर अवलंबून असल्याचे बोलले जाते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून एफडीएच्या अधिकाèयांनी विविध भागांत तपासण्या सुरू केल्याने संबंधित व्यवसायींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याही दुकानावर कारवाई होऊ शकते, या धास्तीने अनेकांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले आहे. घाटंजी शहरातील अनेक पानटपèया बंद दिसून आल्या. काही ठिकाणी दुकाने उघडी असली तरी गुटखा व पान मसाल्याची विक्री बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक पानटपरी चालकांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी तात्पुरता व्यवसाय बंद ठेवला आहे.
याच प्रकारचे चित्र जिल्ह्यातील इतर तालुके आणि यवतमाळ शहरातही पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. एफडीएकडून अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, परवाने, साठा आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन याबाबत विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन न करणारे व्यवसायी सध्या सावध झाले आहेत. प्रशासनाच्या वाढत्या हालचालींमुळे बाजारपेठेत एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली असून अनेकांनी स्वतःहून व्यवसाय बंद ठेवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. अनेक ठिकाणी स्वच्छता, परवाने आणि अन्नसुरक्षा नियमांची पडताळणी सुरू असल्याने छोटे-मोठे व्यवसायीही सतर्क झाले आहेत. भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणारे तसेच नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये कारवाईची भीती अधिक असल्याचे बोलले जात आहे. संभाव्य दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी काहींनी तात्पुरती माघार घेतली असून बाजारपेठेत याचीच चर्चा रंगत आहे. एफडीएच्या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रीला मोठा फटका बसल्याचे दिसत असून, मुंढे पॅटर्नची धास्ती सध्या पानटपरी चालक आणि संबंधित व्यावसायींमध्ये स्पष्टपणे जाणवत आहे.