काबुल,
Ban on smartphone usage in Afghanistan तालिबान्यांचा कर्मचाऱ्यांना 'डिजिटल शॉक'अफगाणिस्तानात तालिबान सरकारच्या नव्या आदेशामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज पूर्णपणे बदलले आहे. सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या निर्देशानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी स्मार्टफोन वापरण्यास कठोर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी स्मार्टफोन पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन केल्यास नोकरी गमावण्यापासून ते कायदेशीर कारवाईपर्यंत कठोर परिणाम भोगावे लागू शकतात. काही भागांत तर नियम मोडल्यास तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अफगाणिस्तानातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये हा आदेश लागू होण्यास सुरुवात झाली असून, अनेक कर्मचाऱ्यांनी आपले स्मार्टफोन बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, हा निर्णय अचानक लागू झाल्याने अनेक विभागांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, कारण दैनंदिन कामकाजासाठी व्हॉट्सअॅप, ईमेल आणि डिजिटल साधनांवर त्यांचे मोठे अवलंबित्व होते. स्मार्टफोन बंदीमुळे कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
दुर्गम भागांमध्ये, विशेषतः बदख्शान प्रांतात, या नियमाच्या उल्लंघनासाठी सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या निर्णयामुळे अफगाणिस्तानातील सरकारी प्रशासन डिजिटल युगापासून आणखी दूर जात असल्याची चर्चा सुरू झाली असून, पुढील काळात या धोरणाचा कामकाजावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.