बंगळूरू,
bodybuilder Sushil Kumar passes away राष्ट्रीय बॉडीबिल्डर सुशील कुमार यांच्या अकस्मात निधनाने कर्नाटकातील क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणारे हे युवा बॉडीबिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने काळाच्या पडद्याआड गेले. अवघ्या 26व्या वर्षी त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह क्रीडाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. सुशील कुमार हे नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम करून दिवसाची सुरुवात केली होती. दिवसभराची दिनचर्या सुरळीत सुरू असतानाच संध्याकाळी जिममध्ये जाण्यापूर्वी ते आपल्या आईला कामावर सोडण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र घरासमोरच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासणीत त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याचे सांगितले. वैद्यकीय उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना अधिक वेदनादायक ठरली कारण त्यांच्या आईने आपल्या मुलाचा शेवटचा क्षण डोळ्यांसमोर पाहिला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशील कुमार हे केवळ यशस्वी बॉडीबिल्डर नव्हते, तर शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी जीवनशैलीसाठीही ओळखले जात होते. कठोर व्यायाम, फिटनेसबद्दलची निष्ठा आणि इतर तरुणांना मार्गदर्शन करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते अनेकांसाठी आदर्श बनले होते. त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शेकडो पदके पटकावली होती.