- गरिमा सिंह सर्वोत्कृष्ट बॉक्सर
नागपूर,
boxing competition महाराष्ट्र राज्य प्रथम सब-ज्युनिअर, कॅडेट आणि क्यूब बॉईज अँड गर्ल्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप-२०२६ मध्ये नागपूर जिल्हा बॉक्सिंग संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ९ पदके जिंकली. संघाने ४ सुवर्ण आणि ५ कांस्य पदकांची कमाई नागपूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. ही यशस्वी कामगिरी संघाचे प्रशिक्षक गणेश पुरोहित, रौनक खांबलकर, योगेश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली. क्यूब गटातील मुलींच्या ३४-३६ किलो वजनी गटात दिशा ठाकूरने कांस्य पदक पटकावले. मुलांच्या ३२-३४ किलो गटात दिशान शर्ली यानी कांस्य पदक जिंकले. तर ३६-३८ किलो वजन गटात श्रेयश देशमुख याने उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदकावर कब्जा केला.
कॅडेट मुलींच्या गटात ३६-३८ किलो वजनी गटातील अविका सव्वालाखे आणि ४८-५० किलो गटातील गरिमा सिंह यांनी सुवर्ण पदके जिंकली. गरिमा सिंह हिला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅडेट मुलींच्या गटातील सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून गौरविण्यात आले.
सब-ज्युनिअर मुलींच्या ४०-४३ किलो गटात तृष्णाने कांस्य पदक जिंकले. ४६-४९ किलो गटात नावण्या सव्वालाखे हिने सुवर्णपदक पटकावत नागपूरचा झेंडा उंचावला. नावण्याला सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख बॉक्सर हा विशेष पुरस्कार ही प्रदान करण्यात आला. ७० किलो पेक्षा अधिक वजनी गटात हीबा खान हिने कांस्य पदकाची कमाई केली.
सब-ज्युनिअर मुलांच्या ७० किलो पेक्षा अधिक वजनी गटात हृद्यांश याने कांस्य पदक मिळविले.
नागपूर संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खेळप्रेमी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.