- विद्यापीठ शिक्षण मंचाच्या पाठपुराव्याला यश
- उर्वरित मागण्या शासनाकडे धोरणात्मक निर्णयासाठी
नागपूर,
CHB post recognition विद्यापीठ शिक्षण मंचाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून अंशकालीन प्राध्यापकांच्या (सीएचबी) पदांना पूर्ववत मान्यता देण्याबाबत शिक्षण सहसंचालकांनी पत्र जारी केले आहे. मंचाने अंशकालीन प्राध्यापक, कार्यभार निश्चिती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण सहसंचालकांकडे सादर केले होते.
निवेदनात नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार निश्चित होईपर्यंत भाषा व इतर विषयांच्या प्राध्यापकांना अतिरिक्त घोषित करू नये, सीएचबी पदांना तातडीने पूर्ववत मंजुरी द्यावी, तसेच मेजर विषयासाठी २४ विद्यार्थ्यांची अनिवार्य अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याशिवाय एनईपी-२०२० अंतर्गत ओई, आयकेएस, व्हीईसी, व्हीएससीई यांसारख्या अभ्यासक्रमांचा कार्यभार कसा मोजला जाणार, याबाबतही स्पष्टता मागण्यात आली होती.
महामंत्री डॉ. सतीश चाफले यांनी सांगितले की, शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत सीएचबी भरतीसंदर्भातील मागणी तत्काळ मंजूर केली असून संबंधित पत्र संस्थेला सुपूर्द केले आहे. इतर मागण्या धोरणात्मक निर्णयासाठी शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत.
मंजूर झालेल्या निर्णयानुसार सर्व महाविद्यालयांनी सीएचबी पदांसंदर्भातील सुधारित प्रस्ताव शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे तातडीने सादर करावेत, जेणेकरून पूर्वीप्रमाणे पदांना मंजुरी देता येईल, असे आवाहन विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे करण्यात आले आहे.