विठुरायाच्या मूर्तीवर रसायनांचा स्पर्श नको!

वारकऱ्यांचा संताप

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
पंढरपूर,
chemicals on the idol of Vithuraya. पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरयेथे स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मूर्तीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मंदिर समितीने २२ ते २४ जूनदरम्यान रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला असला, तरी विविध धार्मिक आणि वारकरी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने रासायनिक लेपनाऐवजी नैसर्गिक पद्धतीने व्रजलेप करण्याची जोरदार मागणी केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, मंदिर समितीने हा निर्णय मागे घेतला नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. यापूर्वीच वारकरी पाईक संघानेही या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे.
 
 
 
cfvr6te6566
चारवेळा झाली आहे लेपन प्रक्रिया
मंदिर समितीच्या मते, श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज होत असल्याने तिचे जतन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक बनले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० अशा चार वेळा ही प्रक्रिया करण्यात आली होती. आता पुन्हा मूर्तीवर झीज झाल्याचे निदर्शनास आल्याने प्रक्रिया करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र विरोधकांचे म्हणणे वेगळे आहे. सुनील घनवट यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात काही वर्षांपूर्वी नैसर्गिक व्रजलेप प्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली होती आणि त्याचे परिणाम आजही समाधानकारक आहेत. बेहडा, दुर्वा अर्क आणि बिब्ब्याच्या तेलासारख्या सेंद्रीय घटकांचा वापर करून ही प्रक्रिया केली गेली होती. त्यामुळे विठ्ठल मूर्तीसाठीही नैसर्गिक पर्याय स्वीकारावा, अशी त्यांची मागणी आहे.
 
 
करवीर पीठाचे शंकराचार्य आले पत्र
घनवट यांनी रासायनिक प्रक्रियेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन थांबू शकते आणि त्यामुळे मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा धोका वाढू शकतो, असा दावा त्यांनी केला. तसेच करवीर पीठाचे शंकराचार्य यांनीही रासायनिक प्रक्रिया टाळावी, असे लेखी पत्र मंदिर समितीला दिल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, मंदिर समितीने मात्र आपली भूमिका कायम ठेवली आहे. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, मूर्तीचे जतन आणि संवर्धन हाच समितीचा एकमेव उद्देश आहे. शासन आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारच ही प्रक्रिया केली जात असून ठरलेल्या वेळापत्रकानुसार ती पूर्ण केली जाईल. या संपूर्ण प्रकरणामुळे पंढरपुरात धार्मिक आणि भावनिक वातावरण तापले असून रासायनिक लेपन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वाद अधिक तीव्र झाला आहे. आता मंदिर समिती पुढील भूमिका काय घेते आणि हा वाद कोणत्या दिशेने जातो, याकडे वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.