वॉशिंग्टन
Daveigh Chase हॉलिवूडमधील लोकप्रिय बालकलाकार आणि व्हॉइस आर्टिस्ट डेव्हीग चेस यांचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘लिलो अँड स्टिच’ या डिस्नी अॅनिमेटेड चित्रपटातील लिलो या पात्राला आवाज देणारी आणि ‘द रिंग’ या हॉरर चित्रपटातील भयावह सॅमारा मॉर्गनची भूमिका साकारणारी चेस ही जगभरात ओळखली जाणारी अभिनेत्री होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चेस यांचे निधन मेंनिंजायटिस आणि रक्तातील गंभीर संसर्गामुळे झाले असून, त्यामुळे सेप्सिसची स्थिती निर्माण झाली होती. त्यांचे निधन मंगळवारी झाले असल्याचे त्यांच्या बॉयफ्रेंड रॉय हर्नांडेझ यांनी माध्यमांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच त्यांना अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.रॉय हर्नांडेझ यांनी सांगितले की, चेस यांना काही काळापासून गंभीर आरोग्य समस्या जाणवत होत्या. त्यांच्या उपचारांसाठी तसेच मदतीसाठी अलीकडेच गोफंडमी मोहीमही सुरू करण्यात आली होती. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल अशी अपेक्षा असतानाच ही दुर्दैवी घटना Daveigh Chase घडल्याने हॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.डेव्हीग चेस यांनी बालवयातच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता आणि अल्पावधीतच त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. 2002 मध्ये त्यांनी ‘लिलो अँड स्टिच’ आणि ‘द रिंग’ या दोन्ही वेगळ्या शैलीतील चित्रपटांमधून मोठे यश मिळवले. त्याचबरोबर त्यांनी ‘डॉनी डार्को’, ‘स्पिरिटेड अवे’ (इंग्रजी डब) आणि ‘बिग लव्ह’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्येही उल्लेखनीय काम केले होते.
त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजलीचा वर्षाव होत असून, त्यांच्या संस्मरणीय भूमिका आणि आवाज अभिनयामुळे त्या नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील, असे अनेकांनी नमूद केले आहे.