"‘मूर्त-अमूर्त’ हा जीवनाला सामोरे जाण्याचा शहाणपणाचा प्रवास"

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
- डॉ. बबनराव नाखले यांचे प्रतिपादन
- कवी डॉ. श्यामल सराडकर यांच्या अभंगमय काव्यसंग्रहाचे लोकार्पण उत्साहात

नागपूर,
Dr. babanrao nakhle "'मूर्त-अमूर्त' हा केवळ काव्यसंग्रह नसून जीवनाला सामोरे जाण्याचा शहाणपणाचा प्रवास आहे. या अभंगांमधून कवीने माणुसकी, निसर्ग आणि जीवनमूल्यांचा शोध घेतला असून, वाचकाला अंतर्मुख करणारा विचार मांडला आहे," असे प्रतिपादन नागपूर आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बबनराव नाखले यांनी केले.
 
 
,irt dls
 
डॉ. दंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात कवी डॉ. श्यामल बबन सराडकर यांच्या 'मूर्त-अमूर्त' या अभंगमय काव्यसंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे, शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ साबळे उपस्थित होते. समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे कविता संग्रहावर भाष्य केले. विशेष अतिथी म्हणून काव्यसमीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे यांची उपस्थिती होती.
काव्यसंग्रहावर भाष्य करताना डॉ. अक्षयकुमार काळे यांनी सराडकर यांच्या कवितांमध्ये सामाजिक विषमता, निसर्ग, स्वातंत्र्य आणि माणसाच्या अंतर्मनाचा शोध प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे सांगितले. "अज्ञानातून विज्ञानाकडे आणि निसर्गाकडे नेणारा विचारप्रवाह या कवितांमध्ये दिसतो," असे ते म्हणाले.
डॉ. सुधीर भावे यांनी सराडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत, "गायक, चित्रकार आणि कवी अशा तिन्ही भूमिका त्यांच्या कवितांमध्ये सहजपणे प्रतिबिंबित होतात. या कविता प्रगल्भ संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात," असे मत व्यक्त केले.
शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ साबळे यांनी "हस्ताक्षरातून साकारलेल्या कविता वाचकांपर्यंत भावना अधिक जिवंतपणे पोहोचवतात. कमी शब्दांत गहन आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य या संग्रहात आहे," असे गौरवोद्गार काढले.
मनोगतात डॉ. श्यामल सराडकर यांनी कविता, चित्रकला आणि संगीत ही मानवी सर्जनशीलतेची विविध रूपे असल्याचे सांगत, "'मूर्त-अमूर्त' हा माझ्या अंतर्मनातील अमूर्त विचारांचा आणि आत्मशोधाचा प्रवास आहे," अशी भावना व्यक्त केली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती ही आपल्या साहित्यिक प्रवासातील अविस्मरणीय घटना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती.