अनिल कांबळे
नागपूर,
currency racket कमी वेळेत रक्कम दुप्पट-चौपट करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-३, युनिट-४ आणि युनिट-५ यांनी संयुक्त कारवाई करत हसनबाग परिसरातून कुख्यात परवेज उर्फ पप्पू पटेल याच्या टोळीला जेरबंद केले. या प्रकरणी नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अवतारसिंग जग्गूसिंग जुनी (वय ४०, रा. जनकापूर, गोवर्धन चौक, चंद्रपूर अंकित लीलाधर वासनिक (वय ३० वर्षे, रा. सामसवाडी, तुमसर, जिल्हा भंडारा), अंकित राजेंद्र सूर्यवंशी (वय ३५ वर्षे, रा. हसनबाग, नंदनवन), अदनान रोशन खान उर्फ आशू (वय ३१ वर्षे, हसनबाग), मो. मनान मो. इद्रीस शेख (वय ४६ वर्षे, रा. वाठोडा), शाहरुख मनसूफ खान (वय ३१ वर्षे रा. चंद्रपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर नरेश बुचके (रा. बेलखेडा, जिंतूर, जि. परभणी) आणि पाटील (रा. हिंगोली) हे दोघे अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा मास्टरमाईंड पप्पू पटेल असून आरोपींनी यवतमाळ येथील एका तरुणाला ५० हजार रुपयांच्या बदल्यात २ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. तसेच दुसऱ्या एका व्यक्तीकडून ३० लाख रुपये घेऊन त्याच्या बदल्यात तब्बल दीड कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी आरोपींनी कागदांच्या बंडलांवर खऱ्या नोटा चिकटवून ते पार्सलच्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवले होते. फसवणुकीसाठी आरोपी अत्यंत चलाखीने नोटांचे बंडल तयार करत होते. बंडलच्या वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवून मधोमध कोरे कागद भरले जात होते. त्यामुळे पाहणाऱ्याला संपूर्ण बंडल खऱ्या नोटांचे असल्याचा भास होत असे आणि त्यातून नागरिकांना जाळ्यात ओढले जात होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी अशा प्रकारचे अनेक संशयास्पद बंडल आणि पार्सल जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात ही टोळी दीर्घकाळापासून सक्रिय असल्याचे समोर आले असून ग्रामीण भागातील नागरिकांना लक्ष्य केले जात होते. रक्कम दुप्पट करून देणे, जुन्या नोटा बदलून देणे किंवा विशेष संपर्कातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पप्पू पटेल यापूर्वीही वादात
परवेज उर्फ पप्पू पटेल याचे नाव यापूर्वीही currency racket अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये समोर आले आहे. २०२३ मध्ये नंदनवन परिसरात दाखल झालेल्या एका प्रकरणातही त्याच्यावर बनावट नोटा आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळीही पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. सध्या गुन्हे शाखेकडून आरोपींचे मोबाईल फोन, बँक व्यवहार आणि इतर संपर्कांची कसून चौकशी सुरू आहे. या टोळीच्या जाळ्यात अडकलेले आणखी अनेक पीडित समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपासात इतर साथीदारांचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.