- एनएफएससी-लिटूचा महत्त्वपूर्ण करार
नागपूर,
fire safety research अग्निसुरक्षा, रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया सुरक्षा क्षेत्रातील शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (एनएफएससी) आणि लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (लिटू), नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे शैक्षणिक सहकार्य, संशोधन, नवोपक्रम, प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकासाला नवी गती मिळणार आहे.
लिटूचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य आणि एनएफएससीचे प्राध्यापक व संचालक डॉ. ए. आर. सोनटके यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण व होमगार्ड विभागाचे उपमहानिरीक्षक रोमिल बानिया, कुलसचिव डॉ. नीरज खटी, प्रा. डॉ. प्रतिभा अग्रवाल, डेप्युटी फायर अॅडव्हायझर मोरेश्वर कुडकिलवार, डॉ. धनंजय कुमार सिंह तसेच प्राध्यापक आणि अधिकारी उपस्थित होते.
या करारांतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाणघेवाण, इंटर्नशिप, संयुक्त संशोधन प्रकल्प, विशेष प्रशिक्षण, औद्योगिक सुरक्षा उपक्रम, परिसंवाद, कार्यशाळा आणि परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणकीय सुविधा आणि अन्य शैक्षणिक संसाधनांचा परस्पर वापरही केला जाणार आहे.
पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांना संयुक्त संशोधन व मार्गदर्शनाची संधी उपलब्ध होणार असून, कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संयुक्त समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. या भागीदारीमुळे अग्निसुरक्षा, रासायनिक प्रक्रिया सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान विकास क्षेत्रातील संशोधनाला बळ मिळण्यासोबतच उद्योग, शासन आणि संशोधन संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास डॉ. सोनटके यांनी व्यक्त केला.