c घोटाळ्यात १५.५८ कोटींची फसवणूक
- नागपुरातून सुरु होता देशभरात खेळ
अनिल कांबळे
नागपूर,
‘future digital asset’ ऑनलाइन कॉन्फरन्स, आकर्षक परतावा आणि डिजिटल कॉइनच्या माध्यमातून बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘फ्युचर डिजिटल अॅसेट’चा भंडफोड पाचपावली पोलिसांनी केला. या प्रकरणात नागपुरातील एजंट आणि पंजाबमधील कंपनी मालक अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ५ बँक खाती व अनेक डिजिटल वॉलेट गोठवून सुमारे २.१० कोटी रुपये जप्त करण्यात आले, अशी माहीती आयुक्त सिंगल यांनी पत्रपरिषदेत दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कंपनीचा मालक राकेशकुमार मोहनलाल गर्ग उर्फ राकेश अग्रवाल (४८, रा. मुक्तसर, पंजाब) आणि मेहुल शिवाजी दीक्षित (४६, नागार्जुन कॉलनी, जरीपटका, नागपूर) यांचा समावेश आहे. दोघांनाही न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान केवळ तक्रारदारच नव्हे, तर देशभरातील तब्बल ३१ हजार ११७ गुंतवणूकदार या नेटवर्कशी जोडले होते. आतापर्यंत १५.५८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम यामध्ये गुंतवण्यात आली आहे. नागपुरातील २६ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली असून त्यांची सुमारे ५.४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आरोपी गुंतवणूकदारांकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून त्यांना ‘फ्री कॉइन’ आणि ‘मर्चंट कॉइन’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगत होते. वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार चालवला जात होता. रामनगर परिसरातील रीमा घोष (५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरी काम करणारी काजल दीक्षित हिने पती मेहुल दीक्षित यांच्याशी ओळख करून दिली. मेहुलने इंदोरा चौकातील रजत टॉवरमधील कार्यालयात कंपनीच्या योजनांची माहिती दिली. मोफत सदस्यत्व घेतल्यास १०० दिवसांत १२,५०० रुपये मिळतील तसेच २५ नवीन सदस्य जोडल्यास दरमहा एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. कंपनीची कागदपत्रे आणि ऑनलाइन माहिती पाहून रीमा यांचा विश्वास बसला. त्यांनी स्वतःसह २५ अन्य गुंतवणूकदारांना जोडून कंपनीत पैसे गुंतवले. यानंतर ‘मर्चंट कॉइन’ची किंमत भविष्यात एक लाख रुपयांपर्यंत जाईल, असे सांगून त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. रीमा यांनी २.२५ लाख रुपये गुंतवले. अॅपमध्ये लाखो रुपयांचा शिल्लक निधी दिसत असला तरी प्रत्यक्ष पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर कोणतेही पेमेंट मिळाले नाही. सतत नवे नियम सांगून टाळाटाळ करण्यात आल्याने त्यांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
नागपुरातील ३० हजार सदस्य
कंपनीचे जवळपास ३० हजार सदस्य एकट्या नागपुरातून असून या कंपनीत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर १०.२४ लाखांहून अधिक सदस्य असून सदस्याकडून ५ हजार रुपये नोंदणी शुल्क घेतले जात होते. या प्रकरणात पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली असून संपूर्ण नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि अन्य संभाव्य पीडितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.