नवी दिल्ली,
How many matches in IPL 2027 आयपीएल २०२६ संपल्यानंतर लगेचच २०२७ हंगामाबाबत विविध चर्चांना वेग आला आहे. त्यात सर्वात मोठी चर्चा म्हणजे पुढील हंगामात सामन्यांची संख्या ७४ वरून ९४ करण्याचा विचार सुरू असल्याची होती. मात्र या चर्चांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी पूर्णविराम दिला आहे.बीसीसीआयच्या स्पष्ट भूमिकेनुसार आयपीएलमधील सामन्यांची संख्या वाढवली जाणार नाही. म्हणजेच ७४ सामन्यांचा फॉरमॅट पुढील हंगामातही कायम राहणार आहे. परदेशी खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आणि द्विपक्षीय मालिकांमुळे सामना वाढवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पीटीआयशी बोलताना सैकिया यांनी सांगितले की, आयपीएलचा सध्याचा ढाचा संतुलित ठेवणे आवश्यक आहे. परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशांसाठी खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी सामन्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव सध्या पुढे जाणार नाही.तसेच त्यांनी पुढील हंगामाच्या वेळापत्रकाबाबतही माहिती दिली. आयपीएल २०२७ थोडी लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, वाढती उष्णता आणि मान्सूनपूर्व पावसाचा धोका लक्षात घेऊन स्पर्धा दोन आठवडे आधी सुरू करण्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी आयपीएल २०२६ ही २८ मार्च ते ३१ मे दरम्यान खेळवण्यात आली होती. पुढील हंगामही साधारण त्याच कालावधीत, पण थोडा लवकर सुरू करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.