खामगाव पोलिसांची धडक कारवाई; तीन वाहनांसह १४ गोवंशाची सुटका

२२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; गोवंश तस्करांमध्ये खळबळ

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
खामगाव, 
khamgaon-police-action खामगाव शहर पोलिसांनी गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १४ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत तीन वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याने गोवंश तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
 

khamgaon-police-action 
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आणि शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार समृद्धी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू असताना जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
 
 
पहिल्या कारवाईत khamgaon-police-action मेहकर येथील एका आरोपीकडून चार गोवंशीय जनावरे आणि वाहन जप्त करण्यात आले. दुसऱ्या कारवाईत मलकापूर परिसरातील एका वाहनातून पाच जनावरे व वाहन ताब्यात घेण्यात आले. तर तिसऱ्या कारवाईत नांदुरा तालुक्यातील खंडाळा परिसरातून आणखी पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. तिन्ही कारवायांमध्ये मिळून तीन वाहने आणि १४ जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली.
पोलिसांनी जप्त केलेल्या गोवंशीय जनावरांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.गोवंश तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.