शेतकर्‍यांच्या नजरा आकाश आणि पीक कर्जमाफीकडे

पेरण्या खोळंबल्या

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
सेलू,
Kharif Season खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांनी आपली शेतीची मशागत केली. रोहिणी नक्षत्रात पावसाने पुर्णपणे हुलकावणी दिली! मृगधारा कोसळतील ही आशा मावळली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. सोबतच राज्य सरकारने पीक कर्ज माफी जाहीर केली. परंतु, आचारसंहितेचा अडसर आला. आता आचारसंहिता संपण्याची घटीका जवळ आली असल्याने शेतकर्‍यांना पीक कर्ज माफी प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याची आशा बळावली आहे.
 

Kharif Season 2026, Maharashtra Farmers, Delayed Monsoon 
८ जून रोजी मृग नक्षत्राने बेडकावर स्वार होऊन प्रवेश केला. पण, सकाळी ढगाळ वातावरण अन् दिवसभर कडक उन्ह पाहून जीव कासाविस होत आहे. पावसाची गरज जेवढी शेतकर्‍यांना आहे तेवढीच सर्व सामान्यांना आहे. वातावरणात उकाडा असून भरमसाठ विजेचे देयके सर्वसामान्यांच्या दारावर दस्तक देत आहे. मृग नक्षत्र उत्तरार्धात असताना पाऊस आला नाही. हे नक्षत्र २१ रोजी जाऊन गाढव वाहन घेऊन आर्द्रा नक्षत्राला सुरूवात होणार आहे. मृग नक्षत्राचे अवघे चार दिवस राहिले आहे. त्यामुळे पेरण्या या आता आर्द्रा नक्षत्रात होतील, यात शंका नाही. शेतकर्‍यांनी बी-बियाणे खरेदी केले असून पावसाच्या दिवसात तापत असलेला उन्हाळा पाहून शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. सध्या शेतकर्‍यांच्या नजरा आकाशात ढग येईल व पाऊस पडेल याकडे लागल्या आहे.
 
कर्जमुती नंतरच पाऊस येईल काय?
 
शासनाने ३० जूनपर्यंत शेतकर्‍यांचे असलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. एकीकडे लक्ष कर्जमाफीकडे लागले असताना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पण, आता शासनाबरोबर वरुणराजाही रुसला की काय, अशी चर्चा चावडीवर ऐकायला मिळत आहे. या चर्चेत काही जणांच्या मते कर्जमाफी होईल तेव्हाच तर दमदार पाऊस येणार नाही ना, असे उपरोधिक बोलल्या जात आहे.
 
 
धूळ पेरणी नाहीच
 
यावर्षी शेतकर्‍यांनी तुषार व ठिंबक सिंचनावर धूळ पेरणी केलेली नाही. आर्द्रा नक्षत्रात पेरण्या झाल्यास पेरणी नियोजन बदलणार आणि बिघडणार आहे.