पिंपळगाव-खांबीत बिबट्याचा धुमाकूळ

तीन तासांच्या प्रयत्नानंतर यशस्वी जेरबंद

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव
leopard-rampage तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथे गुरुवारी 18 जून रोजी सकाळी गावात शिरलेल्या बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे गावातील अनेकांची भांबेरी उडाली असताना गावकर्‍यांची पळापळ झाली. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने गावात येऊन तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे या बिबट्याला जेरबंद केले. या घटनेमुळे गावात काही काळ भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
leopard
 
leopard-rampage  मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे 5.30 वाजताच्या सुमारास गावातील शाळेच्या आवारात काही नागरिकांना बिबट दिसून आला. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबटने तिथून पळ काढला. काही वेळातच तो गावातीलच लांजेवार यांच्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व दरवाजे बंद करून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली. मात्र, बिबट गावात शिरल्याची माहिती वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तेव्हा गर्दीचा फायदा घेत बिबट्याने त्या जागेतून पोबारा केला. तर पुन्हा काही वेळांनी गावातीलच बोरकर यांच्या घराजवळील शौचालय परिसरात बिबट दिसून आला. याचवेळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर बिबट गावातीलच एका पडक्या घरात शिरल्याचे दिसले. यावेळी वनविभागाने त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, बिबट पुन्हा तेथून निसटला. त्यामुळे काही काळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
 
leopard-rampage  वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जाळे तसेच अन्य आवश्यक साहित्य परिसरात तैनात केले. अखेर वनविभागाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश आले. वन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले बिबट अंदाजे दोन वर्षांची मादा बिबट असून आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान, बिबट पाहण्यासाठी पिंपळगाव-खांबीसह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अर्जुनी-मोरगावचे पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के पथकासह घटनास्थळी तैनात होते.