आरमोरी,
mahavitaran smart meter महावितरणकडून बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढून पूर्वीचे डिजीटल मीटर पुन्हा बसवावेत, वाढीव वीजबिले पूर्ववत करावीत तसेच संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी. येत्या 8 दिवसांत कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन व महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ठाकूर यांनी सांगितले की, आरमोरी शहरासह ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांत ग्राहकांची पूर्वसंमती, लेखी परवानगी किंवा पुरेशी माहिती न देता मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर बसविण्यात आले. अनेक ठिकाणी जुने डिजीटल मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही ते बदलण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना तिप्पट चारपट वीजबिले येऊ लागली आहेत. पूर्वी वाजवी दरात वीजबिल भरणार्या ग्राहकांवर आता वाढीव बिलांचा मोठा आर्थिक भार पडत असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम महावितरण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्मार्ट मीटरबाबत कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असतानाही महावितरणने हुकूमशाही पद्धतीने मीटर बसविल्याचा आरोप नागरिकांकडून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक ग्राहकांनी लेखी स्वरूपात स्मार्ट मीटर नको असल्याची भूमिका घेतली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आरमोरी शहर व ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविताना काही ठिकाणी ग्राहकांनी विरोध केल्यावर शासकीय कामात अडथळा आणल्यास कारवाई होऊ शकते, अशी भीती दाखवून मीटर बसविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणविरोधात असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी 600 ते 700 रुपये वीजबिल येत होते, मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल 6 हजार रुपयांचे बिल आले.mahavitaran smart meter तसेच शिवणी परिसरातील काही ग्राहकांना 12 ते 16 हजार रुपयांपर्यंतची बिले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. येत्या आठ दिवसांत समाधानकारक कारवाई न झाल्यास आरमोरी शहर व तालुक्यात शिवसेनेतर्फे जनमोर्चा, तीव्र आंदोलन आणि महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेला संदिप ठाकुर यांच्यासह आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते, माजी पंस सदस्या पुष्पा वाघ, नगरसेवक सुरज भोयर, शहर अध्यक्ष रुपेश तितीरमारे, शिवसेना नेते निखील धार्मीक, भास्कर सेलोकर, श्रीराम मने, विजय मंडपे, गुणवंत बुल्ले, सिताराम मोहुले, लक्ष्मी खोब्रागडे, रेवनदास निंबार्ते, दिलीप मेश्राम आदी उपस्थित होते.