- कपिलनगर पोलिसांची कारवाई
अनिल कांबळे
नागपूर,
md trafficker कपिलनगर पोलिसांनी पुन्हा एकदा अंमली पदार्थ तस्करांवर धडाकेबाज कारवाई करीत उप्पलवाडी परिसरात सापळा रचून साडेसहा लाख रुपयांहून अधिक किमतीच्या एमडी पावडरसह एका तस्कराला अटक केली. तुलसीराम रामनाथ ठाकूर (२५, अंबाटोली, समतानगर, जरीपटका, नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी पहाटे साडेपाच वाजता कपिलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांना ड्रग्स तस्कराबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तपास पथक हद्दीत गस्तीसाठी पाठवले आणि टेहळणी केली. कबीरनगर चौकाकडून उप्पलवाडी पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवर ड्रग्जची तस्करी होणार असल्याचे कळले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रिब्युनल कोर्टासमोर सापळा रचला. काही वेळातच तिथून जाणाऱ्या दुचाकी (एमएच ४९ बीएन ७७५०) ला पोलिसांनी थांबवले. दुचाकीची आणि चालकाची झडती घेतली असता, त्याच्याकडे १२१.६३ ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली. अधिक चौकशीत आरोपीने ही एमडी पावडर त्याचा साथीदार गौरव नंदागवळी (२४, अंबाटोली, जरीपटका) याच्या मदतीने नागपुरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १२१.६३ ग्रॅम एमडी पावडर, एक मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि ३ हजार ७०० रुपयांची रोकड असा एकूण ६ लाख ७७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. ही कारवाई ठाणेदार सतीश आडे यांच्या मार्गदर्शनात पीएसाय योगेश माल्टे, शहजाद शेख, संजू भूषण, मुकेश हलमारे आणि सागर बघेल यांनी केली.