नंदुभाऊ कुळकर्णी
शेगाव
MNS bell rings in Shegaon शेगाव शहरात नगर परिषदेच्या कामकाजाविरोधात नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्याचे चित्र दिसून आले. विविध प्रभागांतील समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषदेच्या कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मोर्चा नगर परिषदेच्या आवारात पोहोचून आंदोलनात परिवर्तित झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने हे आंदोलन करावे लागल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.या आंदोलनादरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन झोपी गेले असल्याचा आरोप करत, तातडीने समस्या सोडविल्या नाहीत तर अधिक तीव्र पद्धतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.
दरम्यान, नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना सर्व समस्या आधीच हाताळल्या जात असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील प्रत्येक भागातील समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे काम सुरू आहे. मनसेने मांडलेल्या बहुतांश तक्रारींवर प्रशासनाने आधीच कार्यवाही केली असून आंदोलनाला विशेष अर्थ राहत नाही, असे त्यांनी नमूद केले. नागरिक, विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी कोणतीही समस्या निदर्शनास आणून दिल्यास ती तातडीने सोडवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या वादात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनीही भूमिका स्पष्ट केली. शहरात कचरा व्यवस्थापन आणि नाल्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचर्यामुळे समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे नाल्या तुंबण्याचे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वच्छता अभियान सुरू असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले.त्याचबरोबर, नाल्यांमध्ये कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे आणि भविष्यात अशा प्रकारामुळे सार्वजनिक व्यवस्था बिघडल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील स्वच्छतेसाठी नागरिक, प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे शेगाव शहरातील नागरिकांच्या समस्या, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय वाद यामुळे पुन्हा एकदा शहरातील वातावरण तापले आहे.