वर्धा
water pipeline samruddhi शहराशेजारील पिपरी (मेघे)सह १४ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाण्याचा पुरवठा करते. पण, येळाकेळी येथील पम्पिंग हाऊस ते हनुमान टेकडी भागातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीदरम्यान नाममात्र नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम रेंगाळले आहे. याला समृद्धी महामार्ग म्हणजेच एमएसआरडीसीचे आडमुठ धोरण बाधा ठरत आहे.

water pipeline samruddhi येळाकेळी येथील धाम नदीतून पाण्याची उचल करून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण पिपरी (मेघे)सह १४ गावांची तहान भागवते. या गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यावर आणि शासनाकडून निधी मंजूर झाल्यावर सन २००५ ते २००९ या कालावधीत येळाकेळी ते हनुमान टेकडी भागातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ५५९ मिमी व्यासाची आणि ७०२० मीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली. पण, ती जुनी आणि जीर्ण झाल्याने तसेच ती वेळोवेळी फुटत असल्याने सन २०२० मध्ये जलजीवन अंतर्गत ७०० मिमी व्यासाची आणि ७०२० मीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकण्याचे प्रशासनाने निश्चित केले. प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी व सुमारे १७.१९ कोटींचा निधी मंजूर झाल्यावर प्रत्यक्षात हे काम हाती घेण्यात आले. पण, प्रत्यक्षात सुमारे ६७०० मीटर इतकी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करून ही मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यात आली.
water pipeline samruddhi जलवाहिनीच्या मार्गात समृद्धी महामार्ग असल्याने उर्वरित ३०० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्णच राहिले. ३०० मीटरची नवीन जलवाहिनी वेळीच टाकून जुनी व जीर्ण जलवाहिनी वेळोवेळी फुटण्याच्या समस्या निकाली काढण्यासाठी मजिप्राच्या अधिकार्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकार्यांना पत्रव्यवहार केले. पण, महामार्ग प्रशासनाकडून मजिप्राच्या अडचणीत भर पडेल असेच धोरण अवलंबत पत्राला उत्तरे देण्यात आल्याने उर्वरित नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम रेंगाळले आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते १७ जून २०२६ या काळात हिच जुनी मुख्य जलवाहिनी तब्बल ५ वेळा फुटल्याने १४ गावांचा पाणी पुरवठा प्रभावित झाला होता. दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्चही मजिप्राला करावा लागला.
water pipeline samruddhi मजिप्राला सहकार्य करा : उपविभागीय अभियंता धोटे
सन २०२० मध्ये जलजीवन अंतर्गत येळाकेळी ते हनुमान टेकडीपर्यंतची नवीन जलवाहिनी टाकण्यास मंजुरी मिळाली. कामालाही सुरुवात झाली. पण, प्रत्यक्षात ६७०० मिटर मुख्य जलवाहिनी टाकून ती कार्यान्वित करण्यात आली. उर्वरित जलवाहिनी दिवाळीपूर्वी टाकण्याचा मजिप्राचा मानस आहे. ज्या तत्परतेने मजिप्रा जलवाहिनी फुटल्यावर दुरुस्तीचे काम करून पाणी पुरवठा सुरळीत करते, त्याच तत्परतेने पिपरी (मेघे)सह १४ गावांमधील नागरिकांनी मजिप्राचा पाणीपट्टी कर वेळीच आणि नियमित अदा करून मजिप्राला सहकार्य करावे, असे आवाहन मजिप्राचे उपविभागीय अभियंता दीपक धोटे यांनी केले आहे.