तेलबिया पिकांनाही हवी ‘आधारभूत किमत’!

शेतकर्‍यांची पाठ, जिल्ह्यातील अनेक तेल गिरण्या बंद

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
प्रमोदकुमार नागनाथे
गोंदिया
oilseed crops gondia एकेकाळी जिल्ह्यात रब्बी हंगामात मोहरी, जवस, करडई यासारख्या तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र या पिकांना शासनाकडून आधारभूत किमत व हमी खरेदीची सुविधा उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांनी हळूहळू या पिकांकडे पाठ फिरविली. परिणामी या पिकांवर आधारित असलेल्या अनेक तेल गिरण्या बंद पडल्या असून स्थानिक स्तरावरील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या. यावर उपाय म्हणून शासनाकडून तेलबिया पिकांनाही आधारभूत किमतीत खरेदी करावी अशी मागणी शेतकर्‍यांची आहे.
 

oilseed 
oilseed crops gondia सन 2020 नंतर देशात खाद्यतेलाच्या वाढत्या मागणीमुळे आणि तेलबिया उत्पादन वाढविण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनानंतर काही शेतकर्‍यांनी पुन्हा मोहरी, जवस आदी पिकांची लागवड सुरू केली. कमी पाण्यात उत्पादन होत असताना वीज व वेळेची बचत होत असल्याने चांगले उत्पादन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आधारभूत किमतीवर खरेदी केंद्रांची सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश शेतकरी केवळ घरगुती वापरापुरते उत्पादन घेत आहेत.
 
oilseed crops gondia सध्या शासनाकडून धान आणि मका खरेदी केली जाते. त्याच धर्तीवर मोहरी, जवस आदी तेलबिया पिकांचीही शासकीय दराने खरेदी करून तांदूळ प्रक्रियेप्रमाणे या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी तेल गिरण्यांना पुरवठा केल्यास स्थानिक स्तरावर तेल उत्पादनाला चालना मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः शासनाने आधारभूत किमतीवर मोहरी व जवस खरेदी करून त्यावर प्रक्रिया करण्याची प्रभावी यंत्रणा उभारल्यास शेतकरी धानासोबतच पर्यायी तेलबिया पिकांचेही उत्पादन घेण्यास प्रोत्साहित होतील. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, तसेच बंद पडलेल्या तेल गिरण्यांना नवसंजीवनी मिळून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीही होऊ शकेल.
  
oilseed crops gondia पोंगेझरामुळे नवसंजीवन...
कधीकाळी गोंदिया जिल्ह्यात 30 ते 35 तेल गिरण्या कार्यरत असताना कच्च्या मालाच्या अभावी व आर्थिक अडचणींमुळे या गिरण्या बंद पडल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील एकमेव गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील पोंगेझरा फार्मर्स कंपनीने सुरू केलेल्या तेल प्रक्रिया उद्योगामुळे जिल्ह्यात जवस व मोहरी लागवड क्षेत्रात वाढ झाली असून यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात 3 हजार 436.50 हेक्टर क्षेत्रात मोहरी व 1 हजार 188.10 हेक्टर क्षेत्रात जवस पिक घेण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
 
जिल्ह्यात जवस व मोहरी पिकाच्या लागवड क्षेत्रात दरवर्षी वाढ होत असून आगामी हंगामात कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना बियाणांचे मिनी किट वाटप करण्याचे कृषी विभागातर्फे ठरविण्यात आले आहे. तसे प्रस्तावही सादर करण्यात आले आहे.
- निलेश कनवाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, गोंदिया