पिंपरी,
Pimpri Chinchwad Municipal Corporation नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या थेट ऐकून घेण्यासाठी राखीव ठेवलेल्या भेटीच्या दिवशीही महापालिका आयुक्त उपलब्ध नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत मंगळवारी संतप्त नागरिकांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना घेराव घातला. आयुक्त दालनाबाहेर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महापालिकेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार नागरिकांना विविध कामे, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांसंदर्भात अधिकाऱ्यांना भेटता यावे यासाठी आठवड्यातील काही दिवस आणि ठरावीक वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. यापूर्वी नागरिकांसाठी आठवड्यातील तीन दिवस भेटीची सुविधा उपलब्ध होती. मात्र, अलीकडेच या वेळेत कपात करून केवळ मंगळवार आणि गुरुवार असे दोन दिवस, दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत नागरिकांना भेटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगळवारी नागरिकांच्या भेटीचा राखीव दिवस असल्याने दुपारपासूनच अनेक नागरिक आयुक्तांना भेटण्यासाठी महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही आयुक्त भेटीसाठी उपलब्ध झाले नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे अन्य बैठकीसाठी दालनाबाहेर पडताच नागरिकांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत आयुक्तांना बैठकीसाठी रवाना व्हावे लागले.
नागरिकांनी प्रशासनावर Pimpri Chinchwad Municipal Corporation टीका करत भेटीसाठी राखीव असलेल्या वेळेत बैठका आयोजित केल्या जात असल्याचा आरोप केला. खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आयुक्तांकडे धाव घ्यावी लागते, मात्र तेही उपलब्ध होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, भेटीच्या वेळेत कपात केल्यानंतर उपलब्ध असलेला मर्यादित वेळही प्रभावीपणे वापरला जात नसल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे.या घटनेदरम्यान काही लोकप्रतिनिधीही आयुक्तांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करत असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यांनाही दीर्घ प्रतीक्षेनंतर भेट न झाल्याने परत जावे लागल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरा संबंधित बैठक संपल्यानंतर आयुक्त दालनात परतल्यानंतर काही प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांशी त्यांनी चर्चा केली.दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेतील नागरिक संपर्क व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची मागणी होत आहे.