महामार्गावर २४ तास आपत्कालीन यंत्रणा कार्यरत

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
पुणे,
Pune Satara National Highway, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि अखंडित राहावा यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) व्यापक पूर्वतयारी पूर्ण केली असून विशेष आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस, पाणी साचणे, दरडी कोसळणे, दृश्यमानता कमी होणे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या संभाव्य अडचणींना तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
 

Pune Satara National Highway, NHAI Pune, 
पुणे ते सातारा दरम्यानच्या सुमारे १४१ किलोमीटर लांबीच्या सहापदरी राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यापूर्वी देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक कामांना गती देण्यात आली आहे. महामार्गावरील नाले, पाण्याचा निचरा करणाऱ्या संरचना आणि जलवाहिन्यांची साफसफाई करण्यात आली असून पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची विशेष पाहणी करण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगतच्या उतारांची तपासणी करून दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.महामार्गावरील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्याअंतर्गत रुग्णवाहिका, क्रेन, बचाव पथके आणि आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. कोणतीही दुर्घटना किंवा नैसर्गिक अडथळा निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यात येणार आहे.
महामार्गावरील काही महत्त्वाच्या Pune Satara National Highway ठिकाणी सुरक्षा उपाययोजनाही अधिक मजबूत करण्यात आल्या आहेत. वेग नियंत्रणासाठी डिजिटल सूचना फलक, कॅमेरे आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करण्यात येत असून अपघातप्रवण क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खंबाटकी घाटासह संवेदनशील भागांमध्ये सातत्याने देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.गेल्या काही वर्षांत जोरदार पावसामुळे महामार्गावर पाणी साचणे आणि वाहतूक कोंडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदा अशा परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी अधिक सक्षम आणि तत्पर यंत्रणा उभारण्यात आल्याचे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.