नाशिक,
Ramesh Samvatsarkar passes away नाशिकच्या क्रिकेटविश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली असून ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध प्रशिक्षक रमेश संवत्सरकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नाशिकमधील क्रिकेट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. क्रिकेट जगतात ते ‘जॉनी सर’ या नावाने ओळखले जात होते. अनेक दशकांपासून त्यांनी तरुण खेळाडूंना प्रशिक्षण देत नाशिकच्या क्रिकेटला दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक खेळाडू घडले आणि पुढे राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. त्यांच्या योगदानाची दखल घेत नाशिक क्रिकेट असोसिएशनने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

‘जॉनी’ हे टोपणनावही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडलेला एक रंजक किस्सा आहे. देव आनंद यांच्या ‘जॉनी मेरा नाम’ या चित्रपटाच्या काळात मैदानावर यश मिळाल्यानंतर ते उत्साहाने “जॉनी मेरा नाम” अशी घोषणा करत असत. सहकाऱ्यांमध्ये हीच ओळख पुढे इतकी रुजली की ते कायमचे ‘जॉनी सर’ म्हणून प्रसिद्ध झाले. नाशिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धेतील विजयातही त्यांचा मोलाचा वाटा होता. सांगलीविरुद्धच्या निर्णायक सामन्यात नाशिकचा संघ अडचणीत असताना त्यांनी संयमी आणि दमदार फलंदाजी करत नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. तब्बल पाच तास मैदानावर टिकून राहिलेल्या त्यांच्या या खेळीमुळे नाशिकने पहिल्यांदाच महाराष्ट्र अजिंक्यपदावर नाव कोरले.