वॉशिंग्टन,
Ronaldo's record in FIFA fades फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघाला अनपेक्षित धक्का बसला असून डीआर काँगोविरुद्धच्या सामन्यात विजय हुकला.'गट क'मधील या लढतीत पोर्तुगालला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे संघाच्या विजयी मोहिमेला सुरुवातीलाच अडथळा निर्माण झाला. ह्यूस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पोर्तुगालने दमदार सुरुवात केली. अवघ्या सहाव्या मिनिटाला जोआओ नेवेसन याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पेड्रो नेटो याच्या अचूक क्रॉसवर नेव्हेसने शानदार हेडर मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि पोर्तुगालने 1-0 अशी आघाडी घेतली.
मात्र सुरुवातीच्या धक्क्यानंतर डीआर काँगोने शानदार पुनरागमन केले. आफ्रिकन संघाने आक्रमक खेळ करत पोर्तुगालच्या बचावावर सतत दबाव ठेवला. अखेर पहिल्या हाफमध्ये योआने विसा याने जोरदार हेडरद्वारे गोल करत सामन्यात बरोबरी साधली. या गोलाने डीआर काँगोच्या फुटबॉल इतिहासात सुवर्णक्षण नोंदवला. 52 वर्षांनंतर विश्वचषकातील त्यांचा हा पहिला गोल ठरला. पोर्तुगालकडे चेंडूचा ताबा अधिक असला तरी त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्या सहकाऱ्यांना काँगोच्या मजबूत बचावामुळे फारशी संधी मिळाली नाही. दुसऱ्या हाफमध्ये पोर्तुगालने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, पण काँगोचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.
या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. वयाच्या 41 वर्षे 132 दिवसांत विश्वचषक सामना सुरू करणारा तो सर्वात वयस्कर मैदानी खेळाडू ठरला. तसेच हा त्याचा 23 वा विश्वचषक सामना होता, ज्यामुळे त्याने पाओलो माल्दिनीयांच्या विक्रमाची बरोबरी केली. मात्र वैयक्तिक विक्रम नोंदवूनही रोनाल्डोला संघाला विजय मिळवून देता आला नाही. दुसरीकडे डीआर काँगोने विश्वचषक इतिहासातील पहिला गोल आणि पहिला गुण मिळवत संस्मरणीय कामगिरी केली. या निकालामुळे गट क मधील स्पर्धा अधिक रोमांचक बनली आहे.