चेन्नई,
Samantha's meeting with CM Vijay अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असतानाच तिने केलेल्या एका खास भेटीने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. चेन्नई दौऱ्यादरम्यान सामंथाने जोसेफ विजय यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या भेटीनंतर तिने लिहिलेली भावनिक पोस्ट चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईत पोहोचलेल्या सामंथाने मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतली. लाल रंगाच्या साडीतील तिचा साधा पण आकर्षक लूकही चर्चेचा विषय ठरला. फोटो शेअर करताना तिने विजय यांच्याबद्दल मनापासूनच्या भावना व्यक्त केल्या.

सामंथाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, विजय हे फक्त पडद्यावरील नायक नाहीत, तर त्यांच्यात नेहमीच काहीतरी मोठे करण्याची क्षमता दिसत आली आहे. त्यांची ऊर्जा, व्यक्तिमत्त्व आणि लोकांशी असलेले नाते पाहून ते मोठ्या जबाबदारीसाठीच घडले आहेत, असा विश्वास तिने व्यक्त केला.राजकारणात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचाही सामंथाने विशेष उल्लेख केला. आधीच यशस्वी असलेल्या क्षेत्रातून बाहेर पडून नवीन आव्हान स्वीकारणे सोपे नसते, पण विजय यांनी ते धाडस दाखवले, असे ती म्हणाली. बदल घडवण्याच्या विश्वासातूनच अशी मोठी पावले उचलली जातात, असेही तिने नमूद केले. सामंथाने पुढे विजय यांना शुभेच्छा देताना त्यांना शक्ती, शहाणपण आणि ध्येय गाठण्यासाठी आवश्यक धैर्य लाभो, अशी इच्छा व्यक्त केली. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला. अनेकांनी या भेटीचे कौतुक करत ही पोस्ट अत्यंत प्रेरणादायी असल्याचे म्हटले.