भारतीय महिला संघाने केला रानांचा वर्षाव

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Smriti and Shafali's explosive innings आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत इतिहासाच्या पानांवर आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजीचा शानदार नमुना सादर करत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. या विक्रमी खेळीमुळे महिला टी-20 विश्वचषकात 200 पेक्षा अधिक धावा करणारा भारत इंग्लंडनंतरचा केवळ दुसरा संघ ठरला आहे. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्याच विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला भक्कम पाया मिळवून दिला. दोघींनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत अवघ्या 11.4 षटकांत 115 धावांची भागीदारी उभारली.
 
 

Smriti and Shafali 
स्मृती मंधानाने पुन्हा एकदा आपल्या क्लास आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ दाखवत 47 चेंडूत 74 धावांची तुफानी खेळी केली. दुसरीकडे शफाली वर्माने 38 चेंडूत 55 धावा करत संघाच्या धावगतीला आणखी वेग दिला. मधल्या फळीतही फलंदाजांनी आक्रमक लय कायम ठेवत भारताला 20 षटकांत 5 बाद 209 धावांपर्यंत पोहोचवले.महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात 200 धावांचा टप्पा फार कमी वेळा ओलांडला गेला आहे. याआधी इंग्लंडने दोनदा हा पराक्रम केला होता. आता भारताने 209 धावा करून या प्रतिष्ठित यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी भारताचा सर्वोत्तम स्कोअर 2018 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 194 धावा इतका होता.
 
भारतीय संघाची या स्पर्धेतील कामगिरी सातत्याने प्रभावी राहिली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर 64 धावांनी दणदणीत विजय मिळवत विजयी सलामी दिली होती. त्या सामन्यातही स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळी केली होती, तर दीप्ती शर्माच्या घातक गोलंदाजीने पाकिस्तानचा डाव कोसळला होता. सलग दमदार प्रदर्शनामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता सर्वांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील सामन्याकडे लागले आहे. 21 जून रोजी मँचेस्टरमध्ये होणाऱ्या या लढतीतही भारताची विजयी घोडदौड कायम राहते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.