टी-२० मध्ये स्मृतीचा विश्वविक्रम!

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Smriti's world record in T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने आपल्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ सामन्यात तिने असा विक्रम केला, जो पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये आजवर कोणत्याही खेळाडूला साध्य करता आलेला नाही. लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्मृती मंधाना हिने ४७ चेंडूंमध्ये ७४ धावांची शानदार खेळी साकारली. तिच्या या खेळीत ११ चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. तिच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकांत २०९ धावांचा डोंगर उभारला आणि नंतर ९५ धावांनी विजय मिळवला. या कामगिरीसाठी तिला सामनावीराचा किताबही मिळाला.
 
  
smriti mandhana
या सामन्यात सर्वात मोठी चर्चा तिच्या ऐतिहासिक विक्रमाची झाली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० चौकारांचा टप्पा पार करत Smriti Mandhana ही पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. सध्या तिच्या नावावर ६०४ चौकारांची नोंद असून ती या यादीत अव्वल स्थानी आहे.या क्रमवारीत न्यूझीलंडची सुझी बेट्स ५२१ चौकारांसह दुसऱ्या स्थानी असून श्रीलंकेची चमारी अथापट्टू तिसऱ्या स्थानी आहे. पुरुष क्रिकेटमध्येही अनेक दिग्गज फलंदाज या विक्रमापासून मागे आहेत, ज्यामुळे मंधानाची कामगिरी अधिकच विशेष ठरते.
 
 
चौकारांबरोबरच धावांच्या बाबतीतही स्मृती मंधाना आघाडीवर आहे. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर ४४७५ धावा असून ती केवळ सुझी बेट्सच्या मागे दुसऱ्या स्थानी आहे. बेट्स लवकरच निवृत्त होणार असल्याने मंधाना हा विक्रमही लवकरच आपल्या नावावर करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या विक्रमी कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा Smriti Mandhana हिचे नाव सुवर्णाक्षरात नोंदले गेले आहे.