खा. संजय देशमुखांविरोधात उबाठा शिवसेना ‘आक्रमक’

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
पुतळ्याला जोडे मारत निषेध : बैठकीला दांडीने चर्चांना उधाण

यवतमाळ, 
ubt shiv Sena ‘aggressive’ खासदार संजय देशमुख हे शिवसेनेते प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी वेग घेत असतानाच उबाठा शिवसेनेच्या सैनिकांचा संताप रस्त्यावर उसळला. शहरातील मेडिकल कॉलेज चौक येथे शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत खा. देशमुख यांच्या विरोधात जोरदार ‘जोडे मारा’ आंदोलन केले. यावेळी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पुतळ्याचे दहनही करण्यात आले. गद्दारांना जोडे मारा, निष्ठावंत शिवसैनिक जागा आहे, गद्दारी खपवून घेतली जाणार नाही अशा घोषणांनी मेडिकल कॉलज चौक चौक परिसर दणाणून गेला.
 
 
UBT Shiv Sena
 
या आंदोलनात वणीचे आमदार संजय देरकर, यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाèयांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांची संघटना आहे. पद आणि सत्तेसाठी विचारांशी बेईमानी करणाèयांना शिवसैनिक कधीच माफ करणार नाहीत, असा इशारा दिला.
 
 
विशेष म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला गैरहजर राहिलेल्या सहा खासदारांमध्ये संजय देशमुख यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, देशमुख यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
 
खा. संजय देशमुख नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे आता केवळ यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचेच नव्हे तर राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधीच उबाठा सेनेने रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त केल्याने आगामी राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.