उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा पडली फूट

    दिनांक :18-Jun-2026
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
shivsena split तृणमूल काँग्रेस सांसदीय पक्षात फूट पडल्यानंतर आता शिवसेना उबाठातही उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवत आपला गट शिवसेना एकनाथ शिंदे गटात विलीन करण्याची मागणी केली. या पत्रावर संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर पाटील, भाऊसाहेब वाकचोरे आणि ओमराजे निंबाळकर अशा खासदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत. शिवसेनेचे लोकसभेत ९ खासदार आहेत, त्यातील सहा म्हणजे दोनतृतियांश खासदारांनी अशी मागणी केल्यामुळे ती मान्य होण्यात आता कोणतीच कायदेशीर अडचण दिसत नाही.
 
 

उध्दव ठाकरेंच्या शिवसे 
 
 
तृणमूल काँग्रेस विधिमंडळ पक्षात आधी फूट पडली, पक्षाच्या ८० पैकी ५८ आमदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला, त्यानंतर तृणमूल काँग्रेस सांसदीय पक्षातील फुटीवरही शिक्कामोर्तब झाले. पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी आधी आपला वेगळा गट स्थापन केला, त्यानंतर पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी त्यांनी आपला गट त्रिपुराच्या नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियात (एनसीपी) विलीन केला. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील शिवसेना उबाठात झाली आहे. मात्र उबाठातील घटनाक्रम पश्चिम बंगालमधील राजकीय घटनाक्रमापेक्षा वेगळा दिसत आहे. उबाठाच्या सांसदीय पक्ष आधी फूट पडली, नंतर विधिमंडळ पक्षात फूटण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये नेमके याच्या उलट झाले. तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात आधी फूट पडली, नंतर सांसदीय पक्षात. विधिमंडळ पक्षातील फुटीनंतर तृमणूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा उध्दव ठाकरे झाला, असे म्हटले गेले. पण नंतरच्या घटनाक्रमाने उध्दव ठाकरे यांचा ममता बॅनर्जी झाल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर होणार, याची चर्चा बर्‍याच महिन्यांपासून सुरु होती,ती आता प्रत्यक्षात आली आहे. ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन तुतारी झाले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
 
शिवसेनेचा हिरक महोत्सवी वर्धापनदिन १९ जूनला होत आहे, त्याचा मुहूर्त साधत शिवसेना उबाठात फूट पडली आहे. शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी बोलवलेल्या बैठकीला पक्षाचे ९ पैकी फक्त चारच खासदार सदेह उपस्थित होते. उर्वरित पाच खासदारांनी आभासी पध्दतीने आपली उपस्थिती लावली होती, त्याचवेळी शिवसेनेत फूट पडणार, हे स्पष्ट झाले होते. कारण आभासी पध्दतीने उपस्थित राहणार्‍या खासदारांनी आपल्या सदेह अनुपस्थितीची जी कारणे सांगितली होती, ती अतिशय मामुली होती, पटण्यासारखी नव्हती.
शिवसेनेचे अतिवाचाळ प्रवक्ते संजय राऊत उसने अवसान आणून पक्षात फूट पडणार नसल्याचा दावा करत असले तरी शिवसेनेच्या नेतृत्वालाही पक्षात फूट पडणार असल्याची जाणिव झाली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवशी, ज्यांना जायचे आहे, त्यांनी जावे, आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत असल्याचे उध्दव ठाकरे यांनी उपरोधिकपणे म्हणत नाईलाजाने आपले हात टेकले होते. त्याचक्षणी शिवसेना सांसदीय पक्षातील फूट अटळ झाली होती. सांसदीय पक्षातील या फुटीने शिवसेना विधिमंडळ पक्षातील फुटीचा मार्ग प्रशस्त केला आहे.महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत फूट पडण्याची ही पहिली वेळ नाही, तर सहावी वेळ आहे. म्हणजे आतापर्यंत पाचवेळा पक्षात फूट पडली. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतांनाच शिवसेनेत फूट पडायला सुरुवात झाली होती. शिवसेनेत सर्वात पहिली फूट १९९१ मध्ये नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पडली होती. त्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेतून बारा आमदारांसह बाहेर पडले होते. त्यावेळी प्रसिध्द मराठी कवी सुरेश भट यांचे ‘बेगुमान वरवंट्याचा आज जाहला पाटा, हे हिंदुहदय सम्राटा तो छगन करी तुज टाटा’ असे गीत प्रचंड गाजले होते. त्यानंतर १९९८ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. २००५ या एकाच वर्षात शिवसेना दोनदा फुटली, पहिल्यांदा नारायण राणे बाहेर पडले, तर दुसर्‍यांदा राज ठाकरे. भुजबळ, गणेश नाईक आणि नारायण राणे यांच्या तुलनेत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्याचा धक्का शिवसेनेला मोठा होता.shivsena split कारण राज ठाकरे हे ठाकरे घराण्यातील आणि बाळासाहेबांचे सख्खे पुतणे होते. भुजबळ, राणे आणि गणेश नाईक यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शिवसेना फोडल्याचा पुरेपुर राजकीय फायदा उचलला. पण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर कोणत्याही पक्षात प्रवेश न करता स्वत:ची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन केली. मनसेला निवडणुकीत कोणताही राजकीय फायदा झाला नाही, मात्र आपले स्वतंत्र अस्तित्व राज ठाकरे यांनी कायम ठेवले. या प्रत्येक फुटीचा शिवसेनेवर परिणाम झाला. मात्र त्यामुळे शिवसेना संपली नाही.
शिवसेनेतील सर्वात मोठी फूट एकनाथ शिंदे यांची होती. २०२२ मध्ये शिवसंेनेतील ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. आतापर्यंत शिवसेनेतून अनेक नेते बाहेर पडले, पण त्यामुळे शिवसेना फुटली, त्याची दोन शकले झाली, असे झाले नाही. शिंदेच्या बंडाने शिवसेना पहिल्यांदा खर्‍या अर्थाने फुटली. शिवसेनेची दोन शकले झाली. आमदारांच्या संख्याबळाच्या भरवशावर शिंदे यांनी आपला गटच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला, आणि तो मान्यही झाला, त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह त्यांच्या गटाला मिळाले.
या धक्क्यातून सावरण्याआधीच शिवसेनेत आणखी एक फूट पडली, सहा खासदार बाहेर पडले. खासदारांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या आमदारांनीही सेनेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता बळावली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने शिवसेनेची स्थापना केली होती, त्या शिवसेनेची उध्दव ठाकरे यांनी पुत्रमोहापोटी पार वाट लावली. आपला राजकीय वारस म्हणून आदित्य ठाकरे यांचा राज्याभिेषेक करुन टाकला. उरलीसुरली कसर संजय राऊत यांनी भरुन काढली. आपल्या बेताल विधानांनी शिवसेनेच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकून दिला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेच्या या फुटीसाठी संजय राऊत यांना जबाबदार धरले.
उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी आणि महाराष्ट्राच्या जनतेशी जो विश्वासघात केला, याची किंमत उध्दव ठाकरे यांना चुकवावी लागणार होती, ती त्यांना अशा घटनांनी चुकवावी लागत आहे. ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फल देते रे ईश्वर’ असे जे म्हटले जाते, ते उगाच नाही. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेची शिल्लकसेना म्हणून खिल्ली उडवली जात होती. असेच सुरु राहिले तर त्यांच्याजवळची शिल्लकसेना संपल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना नाही तर शवसेना म्हणून त्यांचा उल्लेख करण्याचा दिवस फारसा दूर नाही. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी आतातरी आपल्या वागणुकीचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, आपल्या हातून झालेल्या चुकांसाठी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, आणि जी काही थोडीफार शिवसेना शिल्लक आहे, ती सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कर्तृत्ववान मुलगा वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेल्या संपत्तीत भर घालून ती वाढवत असतो, पण उध्दव ठाकरेंनी वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी मोठ्या विश्वासाने आपल्या हाती सोपवलेल्या शिवसेनेचे पार धिंडवडे काढले. कोणत्याही कर्तृत्ववान बापाच्या पोटी नालायक मुलगा आला तर तो घरच्या संपत्तीत भर घालण्याऐवजी ती विकल्याशिवाय राहत नाही. शिवसेनेत यापेक्षा वेगळे काय सुरु आहे?
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७